आक्रमक अपप्रचार हाच मोदी सरकारचा एक कलमी कार्यक्रम असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी गुरूवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. भाजपचा सर्व भर हा आक्रमक अपप्रचारावरच आहे. एखाद्या गोष्टीबद्दल अपप्रचार करणे, राजकीय विरोधकांचा अपमान करणे आणि लोकांच्या शहाणपाविषयी शंका घेणे, हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. याशिवाय, सध्या मोदी सरकारकडून सार्वजनिक निधीचा वापर केवळ एका व्यक्तीच्या प्रतिमा निर्मितीसाठी केला जात असल्याचा आरोप यावेळी आनंद शर्मा यांनी केला.

एखाद्या गोष्टीवरून लोकांचे लक्ष हटवणे, अपप्रचार करणे, तथ्यांची तोडमोड करणे, असहिष्णुता, राजकीय विरोधकांची खिल्ली उडवणे आणि लोकांच्या शहाणपणाविषयी शंका घेणे या गोष्टी मोदी सरकारच्या अपप्रचार धोरणाचा भाग आहेत. तसेच केवळ एका व्यक्तीच्या प्रतिमानिर्मितीसाठी सरकारी तिजोरीचा वापर केला जात आहे. भाजपसाठी हा मोदी उत्सव आहे. मात्र, यामध्ये मला देशातील गरीब, बेरोजगार आणि शेतकऱ्यांचा कुठेही सहभाग दिसत नसल्याचे शर्मा यांनी म्हटले. गेल्या तीन वर्षांत सरकारने केवळ खोटी आश्वासने आणि आशा दाखवून जनतेचा विश्वासघात केल्याचाही आरोप शर्मा यांनी केला. तसेच भारताच्या सुरक्षाव्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांत लष्करातील जवानांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आम्ही भाजप सरकारसारखे नाहीत. आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. मात्र, पाकिस्तानसंदर्भातील धोरण निश्चित करावे, एवढेच आमचे पंतप्रधानांना सांगणे आहे. मोदींचे सध्याचे धोरण म्हणजे फसलेल्या मुत्सद्दीपणाचे उदाहरण आहे. केवळ छायाचित्रांमध्ये झळकण्याची संधी म्हणून मोदी या मुद्द्याकडे पाहतात, असा टोलाही आनंद शर्मा यांनी लगावला.