भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे एका व्हिडीओवरून तोंडघशी पडले आहेत. नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून, पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ ट्विट केला. ज्यात केजरीवाल हे कृषी कायद्यांचं समर्थन करत असल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे. मात्र, या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे.

कृषी कायद्यावरून देशाचं राजकारण घुसळून निघालं आहे. दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला असून, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. कृषी कायद्याचा विषय ऐरणीवर असतानाच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ ट्विट केला. महत्त्वाच म्हणजे केजरीवाल कृषी कायद्याचं समर्थन करत असल्याचा दावाही पात्रा यांनी या ट्विटमध्ये केला. मात्र, ट्विटरने हा व्हिडीओ छेडछाड केलेला असल्याचं म्हटलं होतं.

पात्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओची सत्यताही आता समोर आली आहे. अल्ट न्यूजने या व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर व्हिडीओ एडिट केल्याचं दिसून आलं. एका मुलाखतीतील मोजकाच भाग एडिट करण्यात आलेला आहे. पात्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत केजरीवाल म्हणत आहेत की, तुमची जमीन, हमीभाव आणि बाजार समित्या हिरावू घेतल्या जाणार नाहीत. शेतकरी आपला शेतमाल देशभरात कुठेही विकू शकतो. आता शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, कारण तो बाजार समितीच्या बाहेर कुठेही विकू शकतो. दिलीपजी मागील ७० वर्षातील हा कृषीक्षेत्रातील सर्वात क्रांतीकारी बदल असणार आहे,” असं केजरीवाल म्हणत आहेत. पात्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि इतरांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.

अरविंद केजरीवालांनी खरंच कृषी कायद्यांचं समर्थन केलं का? सत्य काय?

अरविंद केजरीवाल यांचा जो व्हिडीओ संबित पात्रा यांनी ट्विट केला आहे, एडिट केलेला आहे. म्हणजे मूळ व्हिडीओशी छेडछाड करण्यात आलेली आहे. मूळ व्हिडीओत अरविंद केजरीवाल कृषी कायद्यांच्या विरोधात बोलत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरील असंख्य लोकांशी पात्रा यांचा व्हिडीओ एडिट केलेलं असल्याचं म्हटलं आहे. ‘झी पंजाब हरयाणा हिमाचल’ने १५ जानेवारी २०२१ रोजी संपूर्ण व्हिडीओ अपलोड केलेला आहे. वाहिनीचे संपादक दिलीप तिवारी आणि त्यांचे सहकारी जगदीप संधू यांनी केजरीवाल यांची मुलाखत घेतलेली असून, तोच हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत काय कट केलं?(व्हिडीओत घेतलेली वाक्य ठळक अक्षरात)

व्हिडीओत ५.५५ मिनिटाला संधू यांनी केजरीवाल यांना प्रश्न विचारलेला आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. याला उत्तर देताना केजरीवाल म्हणतात,”कसं? हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, हे पटवून देण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजपानं त्यांच्या मोठ्या नेत्यांना स्थानिक पातळीवर उतरवलं आहे. मी सगळी भाषणं ऐकली. या भाषणांमध्ये ते काय सांगत आहेत? ते सांगत आहेत की हे कायदे तुमची जमीन घेतली जाणार नाही. पण हा काही फायदा नाही. जमीन शेतकऱ्यांचीच आहे. हमीभाव हिरावून घेतला जाणार नाही. हा सुद्धा फायदा नाही, कारण हमीभाव अगोदरपासूनच मिळत आहे. बाजार समित्या कुठेही जाणार नाहीत. ते आणखी सांगतात की, शेतकरी आता देशात कुठेही शेतमाल विकू शकतात. हाच एक फायदा आहे, जो त्यांनी सांगितला आहे. बरोबर? आता शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळणार आहे. बाजार समितीबाहेर कुठेही शेतमाल विकू शकतो. मी केंद्र सरकारला आदर करून थेट विचारतो. आज पंजाब, हरयाणातील बाजार समित्यांमध्ये गव्हाचा हमीभाव क्विंटलमागे १८०० रुपये आहे. बिहारमध्ये बाजार समित्या नाहीत. तेथील शेतकरी ८०० क्विंटलने गहू विकतात. काय हे सांग शकतात का की, १८०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी त्यांनी बाजार समितीबाहेर कुठे जावं?,” असं केजरीवाल म्हटले आहेत. त्यातील मोजकीच विधानं एडिट करून व्हिडीओ तयार करण्यात आलेला आहे.