कॉर्पोरेट क्षेत्रात वाढणाऱ्या गैरव्यवहारांना नियामक यंत्रणाच कारणीभूत आहे, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. वैधानिक लेखापरीक्षकांसह अन्य नियामक यंत्रणा गैरव्यवहार रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षी या क्षेत्रात तब्बल २९ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप सीबीआयने केला आहे.
देशात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात भ्रष्टाचाराचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कॉर्पोरेट क्षेत्र तर भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे. या क्षेत्रात भ्रष्टाचाराचा आकार आणि परिमाण गेल्या १५ वर्षांत कित्येक पटीने वाढला आहे. प्रवर्तकांकडून पैशांची वसुली करणे, व्यवस्थापनामधील ढिलाई आणि कर्जदाते किंवा गुंतवणूकदारांची फसवणूक अशा प्रकारचे गैरव्यवहार तर कॉर्पोरेट क्षेत्रात वाढत आहेत, असे सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले. ‘असोचेम’ने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील भ्रष्टाचार या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
३१ मार्च २०१३पर्यंत व्यावसायिक बँकांनी गैरव्यवहारांच्या १.६९ लाख प्रकरणांची नोंद केली. या प्रकरणांमध्ये तब्बल २९,९१० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे या बँकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची गेल्या तीन वर्षांत २२,७४७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे, असे सिन्हा यांनी सांगितले. लेखापरीक्षक किंवा अन्य नियामक यंत्रणांनी योग्य उपाययोजना केल्या तरच कॉर्पोरेट क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल, असे सिन्हा म्हणाले.