राहुल गांधी यांचे टीकास्त्र; उत्तर प्रदेशात दौरा
दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. समाजाचे विभाजन करून मोदी स्वत:चे पतन ओढवून घेत असून, शेतकरी आता त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना शिव्या घालत आहेत, असे ते म्हणाले.
पतनानंतर मोदी यांची ‘गच्छंती’ होईल त्या वेळी रिकामी होणारी जागा भरून काढण्यासाठी एकत्र या, असेही राहुल यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. मोदी यांनी शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले, पण आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात मी जिथे कुठे जातो, तेथे शेतकरी त्यांना शिव्या देत आहेत. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि तीन वेळा आश्वासन देऊनही ‘एक श्रेणी- एक वेतन’ची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
आपण सगळे मिळून करून त्याहून अधिक नुकसान मोदी स्वत:चेच करून घेत आहेत. तुम्ही मोदींवर हल्ला चढवत राहू शकता, परंतु त्याहून अधिक हल्ला मोदी स्वत:वर करत आहेत, असे उत्तर प्रदेशातील पक्षनेत्यांच्या एका मेळाव्यात राहुल बोलत होते.
राज्यात सपा, बसपा व भाजप यांच्यानंतर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.