राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठय़ाबाबत जम्मू काश्मीर खोऱ्यात बुधवारी किमान दहा ठिकाणी छापे घातले. यात काही स्वयंसेवी संस्था, तसेच विश्वस्त संस्थांचा समावेश आहे.

धर्मादाय कामासाठी असलेला निधी जम्मू काश्मिरातील दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांसाठी पुरवल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या तपासणीत काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे जप्त करण्यात आली. ज्यांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात खुर्रम परवेझ (जम्मू काश्मीर कोअ‍ॅलिशन ऑफ सिव्हील सोसायटी), त्यांचे सहकारी परवेझ अहमद बुखारी, परवेझ अहमद मट्टा व बंगळुरू येथील स्वाती शेषाद्री, परवीना अहंगर (असोसिएशन ऑफ पॅरेंटस ऑफ डिसअ‍ॅपीअर्ड पर्सन्सच्या अध्यक्षा) यांचा समावेश आहे. अथ्रॉट व जी.के ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालयांची तपासणी करण्यात आली. श्रीनगर, बांदीपोरा व बंगळूरु येथील एका ठिकाणी तपास करण्यात आला.

या प्रकरणी भादंवि तसेच विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायदा अन्वये ८ ऑक्टोबरला विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय?

श्रीनगर येथे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या आवारात असलेल्या विश्वस्त संस्थेची तपासणी करण्यात आली. एकूण तीन स्वयंसेवी संस्थांवर छापे टाकण्यात आले. या संस्थांची स्थापना इ.स २००० मध्ये करण्यात आली होती.

एनआयएच्या माहितीनुसार या स्वयंसेवी संस्थांना अज्ञात स्त्रोतांकडून पैसा मिळत होता व त्याचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता.

छुपा अड्डा उद्ध्वस्त.. : जम्मू-काश्मीरातील पूंछ जिल्ह्य़ाच्या जंगल भागात असलेला दहशतवाद्यांचा एक छुपा अड्डा सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केला आहे. या अड्डय़ावरून शस्त्रे व दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. मेंढर सेक्टरमधील कालाबानच्या जंगल भागात पोलीस व राष्ट्रीय रायफल्स यांच्यावतीने रात्रीच्या वेळी राबवण्यात येत असलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान या अड्डय़ाचा शोध लागला, असे पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अंग्राल यांनी सांगितले.