‘प्रथमतः मी भारतीय आहे’, एका तमिळ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दिलेल्या याच उत्तरामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियामध्ये तर त्यांच्या उत्तराबद्दल मुक्तकंठाने स्तुती केली जात आहे.

डॉ. सिवन यांची ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने घेतलेली एक मुलाखत सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ही मुलाखत दीड वर्ष जुनी आहे. पण, आता या मुलाखतीचा एक छोटा भाग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत, वृत्तवाहिनीचा एक पत्रकार सिवन यांना तमिळ अस्मितेसंदर्भात प्रश्न विचारताना दिसतोय. “एका तमिळ व्यक्तीला इतका मोठा सन्मान मिळाला, तेव्हा तुम्ही तमिळनाडूच्या जनतेला काय संदेश द्याल?”, असा प्रश्न सिवन यांना सन टीव्हीच्या एका पत्रकाराने विचारला. त्यावर सिवन यांनी तातडीने, “मी इस्रोमध्ये एक भारतीय म्हणून आलो. इस्रो संस्था म्हणजे असं ठिकाण आहे, जिथे सर्व भाषेचे आणि धर्माचे लोक एकत्र येऊन कार्यरत राहतात आणि आपलं योगदान देतात. अशा संस्थेत मी काम करतोय आणि माझे बांधव स्तुती करतायेत हे माझं भाग्य आहे”,असे उत्तर दिले.

त्याचं हे उत्तर नेटकऱ्यांना चांगलंच भावलं असून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

विक्रम लँडरशी संपर्कासाठी आता उरले दहा दिवस : विक्रम लँडरशी संपर्कासाठी आता वेळेशी स्पर्धा असून लँडरचा कार्यकाल १४ दिवसांचाच असताना त्यातील चार दिवस संपले आहेत. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांत त्याच्याशी संपर्क झाला तर ठीक अन्यथा विक्रम लँडरचा शेवट होणार आहे. लँडर विक्रममध्ये प्रज्ञान ही रोव्हर गाडी आहे. ती लँडरशी संपर्क असल्याशिवाय बाहेर काढता येणार नाही. त्यामुळे त्याचा संशोधनाच्या पातळीवर कुठलाही उपयोग होणार नाही.

लँडर आघाती अवतरणानंतर कुठलीही मोडतोड न होता तेथे पडल्याच्या माहितीबाबतही वैज्ञानिकात मतभिन्नता आहे. सात सप्टेंबरला विक्रम लँडर शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला पण अगोदर ते व्यवस्थित खाली येत असताना अचानक त्याचा संपर्क चंद्राच्या पृष्ठभूमीपासून २.१ कि.मी उंचीवर असताना तुटला होता व त्यानंतर ते तेथे कोसळले होते. इस्रोने रविवारी असे सांगितले की, विक्रम लँडरचे आघाती अवतरण झाले. रविवारी हे लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर पडल्याचे छायाचित्र ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने टिपले होते. ऑर्बिटर अजून सुरक्षित असून लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रोने असे म्हटले आहे की, ऑर्बिटरच्या छायाचित्रानुसार हे लँडर अजून तुटलेले नसून जसेच्या तसे चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले आहे. हे लँडर कललेल्या अवस्थेत आहे. ते चार पायावर उभे नाही. ते उभ्या अवस्थेत नाही.

लँडरच्या अवस्थेबाबत इस्रोने अधिकृत भाष्य केलेले नाही. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत. लँडर व रोव्हरचा कार्यकाल १ चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांचा आहे. त्यामुळे या काळात जर त्याच्याशी संपर्क झाला नाही तर लँडरचा या प्रयोगातील संबंध कायमचा संपलेला असेल.

इस्रो अधिकाऱ्यांच्या मते हे लँडर जेथे उतरणे अपेक्षित होते त्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर पडले आहे. लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून अखेरच्या टप्प्यात वेग कमी करत असताना त्याची दिशा चुकली असावी.

संवेदक, सॉफ्टवेअर किंवा संगणक बिघाडामुळे तसे झाले असावे. लँडरच्या अपयशाबाबत समिती नेमण्यात आली असून ती त्यात नेमके काय चुकले असावे, यावर प्रकाश टाकणार आहे.