राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो आणि शताब्दीसारख्या प्रिमियम गाड्यांसाठीची फ्लेक्सी फेअर योजना कायम राहणार आहे. रेल्वेकडूनच याला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना बंद होणार असल्याच्या वृत्ताला पुर्णविराम मिळाला आहे. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती.

फ्लेक्सी फेअर योजनेत प्रत्येक दहा टक्के बुकिंगनंतर मूळ तिकिटाच्या किंमतीत दहा टक्के वाढ होते. प्रथमश्रेणी आणि एक्जिक्यूटिव्ह श्रेणीच्या तिकीट दरात मात्र कोणताच बदल होत नाही. याला डायनामिक फेअर असेही म्हटले जाते. आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि रेल्वे काऊंटरवरून तिकीट बुक करण्यावर डायनामिक फेअर लागू होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फ्लेक्सी फेअर योजना फक्त १.५ टक्के मेल आणि एक्स्प्रेसला लागू होत आहे. १२५०० रेल्वेपैकी अवघ्या १६८ रेल्वेला ही योजना लागू होते. फ्लेक्सी फेअर योजनेमुळे अनेक प्रिमियम रेल्वेची आसने रिकामी जात असल्याचे वृत्तही या अधिकाऱ्याने फेटाळले आहे. रेल्वेने ९ सप्टेंबर २०१६ मध्ये ही योजना लागू केली होती.

रेल्वेच्या फ्लेक्सी फेअर योजनेमुळे प्रवासी हवाई प्रवासाला पसंती देत असल्याचे यापूर्वी कॅगने आपल्या अहवालात म्हटले होते. अनेकवेळा फ्लेक्सी फेअरमुळे रेल्वेचे तिकीट हे विमान तिकिटापेक्षा जास्त असते. अशावेळी प्रवासी विमानातून प्रवास करतात.

कॅगच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार रेल्वेने फ्लेक्सी योजनेतून ५५२ कोटी रूपये कमावले आहेत. सप्टेंबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ पर्यंत ६.७५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. कॅगच्या अहवालानुसार या योजनेमुळे पुर्वी आसनं रिकामी जात. ज्यावेळी ही योजना आणण्यात आली. त्यावेळी याचा विचार करण्यात आला नव्हता. तृतीय श्रेणी एसीमध्येही रिकाम्या बर्थची संख्या यादरम्यान ४.४६ टक्के वाढली आहे. मध्यंतरी सरकार फ्लेक्सी योजना मागे घेणार असल्याचे वृत्त येत होते.