काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधीच्या निवासस्थानी झालेल्या पक्षबैठकीत निर्णय
काँग्रेसची महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी म्हणजे २० ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत अन्नसुरक्षा विधेयकाबाबतची चर्चा झाल्याचेही समजते.
अन्न सुरक्षा योजनेमुळे देशातील ८२ कोटी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्यामुळे ही योजना त्वरित लागू व्हावी असे सोनिया गांधी यांनी म्हटले. या योजनेमुळे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस सरकारचे १४ मुख्यमंत्री, काँग्रेस कोअर समितीचे सभासद आणि काही इतर वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित होते. २० ऑगस्टला पहिल्यांदा दिल्लीमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर राज्यातही अन्न सुरक्षा योजना लागू करणार असल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले आहे.