देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांनी ‘इंडिया इंदिरा आहे’ आणि ‘इंदिरा इंडिया आहे’, अशा घोषणा दिल्या होत्या. याची आठवण करुन देताना हिंदुत्व मानणाऱ्यांसाठी देश केवळ ‘भारत माता’ आहे. तर, काँग्रेससाठी ‘इंदिरा’ म्हणजेच भारत आहे, असे भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले आहे.


भाजपाकडून आज देशभरात काळा दिवस पाळण्यात येत आहे. आजच्याच दिवशी ४३ वर्षांपूर्वी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. देशाच्या स्वातंत्र्याला केवळ २८ वर्षे झालेली असताना आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी देशाचे पाचवे राष्ट्रपती म्हणून फखरुद्दीन अली अहमद यांचा कार्यकाळ सुरु होता. यावेळी काँग्रेसकडून इंदिरा म्हणजेच भारत अशा घोषणा देण्यात येत होत्या. काँग्रेसने आपल्या या घोषणाबाजीसाठी आजवर देशाची माफी मागितलेली नाही, असेही त्रिवेदी यावेळी म्हणाले.

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयामुळे देशाला कठीण परिस्थितीतून जावे लागले. २५-२६ जूनच्या रात्री इंदिरा गांधींनी काढलेल्या आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सही केली होती. त्यानंतर तत्काळ देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर जनतेचे सर्व नागरी अधिकार काढून घेण्यात आले होते. वर्तमान पत्रांवरही नियंत्रणे आणण्यात आली होती.

त्याचबरोबर देशातील सर्व प्रकारचे छोट्या-मोठ्या निवडणूका रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरकारचा विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना बंदी बनवून विविध तुरुंगांमध्ये धाडण्यात आले होते.