सरकारने उत्पादन, करनिर्धारण, कामगार या क्षेत्रांत केलेल्या सुधारणांमुळे  परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेत सकारात्मक बदल झाला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कोविड १९ साथीच्या काळातही भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘अ‍ॅसोचेम’च्या स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की कृषी सुधारणांमुळे सहा महिन्यांत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक का करायची असा विचार करीत असत, आता ते भारतात गुंतवणूक का करू नये, असा विचार करीत आहेत. गेल्या सहा वर्षांत सरकारने मोठय़ा सुधारणा राबवल्या असून त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलला आहे.

ते म्हणाले की, एकूण पंधराशे जुने कायदे मोडीत काढून काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशात अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारला यश आले आहे. सरकारचे दृष्टिकोनही स्पष्ट आहेत. पूर्वी गुंतवणूकदार भारतातील कर दरांना घाबरून गुंतवणूक करीत नसत, आज कंपनी कर कमी असल्याने भारतात गुंतवणूक का करू नये असा विचार ते करीत आहेत. पूर्वी लालफितीचा कारभार होता, आता आम्ही गुंतवणूकदारांना पायघडय़ा घातल्या आहेत.

पूर्वी सरकारी हस्तक्षेप खूप मोठय़ा प्रमाणावर होता तो आता राहिलेला नाही. आज खासगी क्षेत्राचा सरकारवरचा विश्वास वाढला असून परदेशी गुंतवणूकदारांनाही उत्तेजन मिळत आहे. सरकारचा भर हा उत्पादन वाढवण्यावर आहे. देशांतर्गत क्षमता त्यासाठी वाढवण्यात येत असून सुधारणांमुळे जागतिक पातळीवर भारताविषयीचे मत अनुकूल झाले आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

‘कृषी सुधारणांविषयी ई पुस्तिकेचे वाचन करा’

कृषी कायद्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कृषी सुधारणांविषयी सरकारने एक  ई पुस्तिका प्रसारित केली असून त्याचे वाचन केल्यास गैरसमज दूर होऊन सरकारची भूमिका समजण्यास मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इंग्रजी व हिंदीत ही पुस्तिका प्रकाशित झाली आहे.