टाटा स्टीलच्या माजी अधिकाऱ्याने सिनियर मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरीदाबादमध्ये कंपनीच्या आवारात हा प्रकार घडला. आरोपीला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मॅनेजर अरींदम पाल त्यांच्या केबिनमध्ये आराम करत असताना आरोपी विश्वास पांडे थेट त्यांच्या केबिनमध्ये घुसला. त्याने पॉईंट ब्लँक रिव्हॉल्वर काढली व पाल यांच्यावर पाच गोळया झाडल्या. रक्ताच्या थारोळयात खाली कोसळलेल्या पाल यांचा जागीच मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले.

इंजिनिअरींगमध्ये पदवीधर असलेला विश्वास पांडे टाटा स्टीलमध्ये मॅनेजर होता. अरींदम पाल यांना विश्वास पांडेच्या वर्तनामध्ये बेशिस्तपणा आढळला होता. त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. टाटा स्टीलमधून कमी केल्यानंतर पांडेकडे दुसरी कुठलीही नोकरी नव्हती. पुन्हा नोकरीवर ठेऊन घ्यावे यासाठी तो सतत चकरा मारत होता.

नोटीस पिरीयडवर असताना त्याने अरींदम पाल यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा दिली होती. पाल यांच्यावर गोळया झाडल्यानंतर तिथे असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी विश्वास पांडेला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हातात बंदुक होती. त्याने अन्य कर्मचाऱ्यांना तुम्हाला सुद्धा गोळया घालीन अशी धमकी दिली व तिथून निसटला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून विश्वास पांडेला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली आहे.