केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेच्या अशा ‘डिजिटल इंडिया वीक’ उपक्रमाचे ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव निश्चित करण्यात येणार असून, या उपक्रमाविषयी व्यापक योजना तयार करण्याच्या दृष्टीने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे. जुलै महिन्यात हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यात केंद्र सरकारची खाती आपल्या विविध सेवां ऑनलाइन करणार आहेत.
डिजिटल इंडिया वीकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी अब्दुल कलाम यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांनी ही जवाबदारी सांभाळण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. मात्र, माजी राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.
२५ मार्च रोजी रवी शंकर प्रसाद यांच्या अध्य़क्षतेखाली पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि राजीव प्रताप रुडी यांची बैठक झाली होती. या उपक्रमाच्या प्रत्येक दिवशी नवीन सेवा कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना यामध्ये सहभागी करुन देण्यावर भर दिला जाणार असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. तसेच या उपक्रमामध्ये विविध संकल्पना कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने काही खासगी कंपन्यांचीही नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले.