पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. दरम्यान चार जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मंगळवारी सकाळी तीन जवान शहीद झाल्याची माहिती होती. यानंतर भारतीय लष्कराने अधिकृत माहिती देत हल्ल्यात जखमी झालेले १७ जवान शहीद झाल्याचं सांगितलं.

भारत-चीन दरम्यान सोमवारी रात्री सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय सैनिकांवर शस्त्रांनिशी हल्ला केला. भारत आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर आलं होतं. यावेळी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले असून चीनचे जवळपास ४३ सैनिक ठार तसंच जखमी झाले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या चकमकीत गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत. लोखंडी गज, खिळे लावलेल्या काठय़ा व इतर शस्त्रांचा वापर चकमकीत चिनी सैन्याने हल्ला केला. यावेळी दगडांचाही वापर करण्यात आला. याआधी १९७५ मध्ये ४५ वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात तुंग भागात अशीच चकमक झाली होती. त्यात आसाम रायफल्सचे चार जवान शहीद झाले होते.

चीनच्या ग्लोबल टाइम्सने सीमेवरील चकमक भारतीय सैन्याने केल्या असून त्यासाठी भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत घुसले असा दावा केला आहे. पण परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषेवर सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होते असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “१५ जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं”.