एक जवानही शहीद
श्रीनगरपासून ९५ कि.मी. अंतरावर असलेल्या हंडवाराच्या जंगलात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला.
कूपवाडा जिल्ह्य़ातील सोचलयारी वनक्षेत्रात दहशतवाद्यांचा एक गट असल्याची खबर सुरक्षारक्षकांना मिळाली. त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम उघडण्यात आली होती. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू झाली, ती गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चकमकीत चार अज्ञात दहशतवादी ठार झाले तर एक भारतीय जवानही शहीद झाला. ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत त्याची चौकशी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला आलेले हे दुसरे यश आहे.
बुधवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. बारामुल्ला जिल्ह्य़ातील रफियाबाद परिसरातील भ्रमणध्वनी मनोऱ्यांवर हल्ले करण्यात या दहशतवाद्याचा हात होता. त्याचे नाव रियाज अहमद असे असून तो लष्कर-ए-इस्लाम या हिजबुल मुजाहिद्दीनच्या फुटीर गटाचा होता.
पाकिस्तानकडून पूंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू- पाकिस्तानच्या सैन्याने पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची गुरुवारी पुन्हा एकदा आगळीक केली. पाकिस्तानच्या सैन्याने छोटय़ा शस्त्रांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. पूंछ जिल्ह्य़ातील कृष्णा घाटी क्षेत्रात बुधवारी रात्री गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, असे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार सुरू करण्यात आला तो रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता. मात्र या गोळीबारात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ऑगस्ट महिन्यांत ५५ वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.