फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रविवारी रात्री एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन ब्रिटीश पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयीत अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक केली आहे. दरम्यान, जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.


 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री ११ च्या सुमारास सेंट्रल पॅरिसच्या पुर्वेकडील ‘डेल ऑर्के’ या कालव्याशेजारी फिरणाऱ्या नागरिकांवर हा हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, हल्लेखोराच्या हातात चाकू आणि लोखंडी रॉड होता. मात्र, अद्याप दहशतवादी हल्ल्याशी या हल्ल्याचा संबंध जोडण्यात आलेला नाही. त्याबाबत तपास सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये आधीपासूनच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.