फ्रान्स एअर फोर्सने मध्य मालीमध्ये एअर स्ट्राइक केला. यामध्ये अल-कायदाशी संबंधित ५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे फ्रान्स सरकारकडून सोमवारी सांगण्यात आले. मालीच्या सीमा भागामध्ये मोटार सायकलचा मोठा ताफा ड्रोन विमानाच्या नजरेत आला. आपण ड्रोनच्या रेंजमध्ये येऊ नये, म्हणून हे दहशतवादी झाडांच्या आड लपण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर फ्रेंच हवाई दलाने मिसाइल हल्ला करण्यासाठी दोन मिराज आणि एक ड्रोन विमान पाठवले.

घुसखोराचा खात्मा करण्यासाठी ही विमाने पाठवण्यात आली होती असे फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरन्स पार्ली यांनी सांगितले. चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरीक बार्ब्री यांनी सांगितले. आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरले जाणारे स्फोटकांचे पट्टे त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. लष्कराच्या ठिकाणांवर हे दहशतवादी हल्ला करणार होते असे फ्रेडरीक बार्ब्री म्हणाले. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

एअर स्ट्राइकमध्ये ३० मोटरसायकल नष्ट झाल्या असे फ्लोरन्स पार्ली म्हणाल्या. फ्रेंच एअर फोर्सची ही कारवाई म्हणजे अनसारुल इस्लाम ग्रुपला मोठा झटका आहे. हा ग्रुप अलकायदाशी संबंधित आहे असे त्या म्हणाल्या. माली हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.