महात्मा गांधी यांचे विचार देशभर पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’वरून कित्येक वर्षे ‘गांधीवंदना’ कार्यक्रम प्रसारित होतो. तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री जयललिता यांनीच गांधी विचारांची ‘गांधीवंदना’ ऐकवत काँग्रेस आमदारांची चांगलीच कोंडी केली.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा, अशी महात्मा गांधी यांचीच इच्छा होती, असे अण्णाद्रमुकच्या एका मंत्र्याने सोमवारच्या चर्चेत नमूद केले होते. त्याला काँग्रेस सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. आपल्या मंत्र्याचे वक्तव्य यथार्थ असल्याचे सिद्ध करण्यासाठी जयललिता मंगळवारी जातीने व तयारीनिशी सभागृहात आल्या. जयललिता यांनी ‘महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड ९०वा’ उघडून महात्माजींचे काँग्रेस बरखास्तीबद्दलचे विचार ऐकविले! ‘फाळणीने का होईना पण देश स्वतंत्र झाला आहे त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेचा हेतू सफल झाला आहे आणि त्यामुळेच काँग्रेसच्या अस्तित्वाची गरजही संपली आहे. आजच्या रूपातील काँग्रेस यंत्रणा ही आता निरुपयोगी झाली आहे,’ असे गांधीविचार जयललितांकडून ऐकतानाच काँग्रेस सदस्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली.