केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

नवी दिल्ली : पवित्र गंगा नदीचे पाणी थेट पिण्यासाठी योग्य नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) म्हटले आहे. नदी वाहत असलेल्या केवळ सात ठिकाणांचेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच आपण पिण्यासाठी वापरू शकतो, असेही मंडळाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश-पश्चिम बंगाल पट्टय़ातील गंगा नदीचे पाणी पिण्यासाठी त्याचप्रमाणे स्नानासाठी योग्य नसल्याचे मंडळाकडे असलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या एका नकाशामध्ये नदीत ‘कोलिफोम’ जीवाणूचा स्तर मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दर्शविले आहे. एकूण ८६ ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या थेट निरीक्षण केंद्रांपैकी केवळ सात भागांमधील पाणीच शुद्धीकरण प्रक्रियेनंतर पिण्यास योग्य असल्याचे, तर ७८ भागांमधील पाणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

गंगा नदीला पवित्र मानले जाते आणि तिची पूजाही केली जाते, गंगा नदीत डुबकी मारण्यासाठी लाखो लोक एकत्र येतात, मात्र या नदीचे पाणी इतके प्रदूषित झाले आहे की, ते पिण्यासाठीच नव्हे तर स्नानासाठीही उपयुक्त राहिलेले नाही, असे मंडळाने म्हटले आहे.

केंद्र सरकार आतापर्यंत गंगा शुद्धीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.