‘गोव्यासारख्या पर्यटनस्थळी बलात्काराच्या किरकोळ घटना घडणारच. पर्यटन उद्योग जिथे बहरात आहे, अशा कुठल्याही ठिकाणी असे घडू शकते’, अशा प्रकारची मुक्ताफळे उधळून गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली असून गोवा काँग्रेसने परुळेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील दोन तरुणींवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. बलात्काराच्या या घटनेचे तीव्र पडसाद गोव्यासह देशभरात उमटले असतानाच परुळेकरांनी वरीलप्रमाणे मुक्ताफळे उधळली आहेत. आपल्या वक्तव्यावर परुळेकर ठाम आहेत. आपण पोलिसांच्या अहवालाच्या आधारावर वरील वक्तव्य केले व त्यात काहीही वावगे नसल्याचे परुळेकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच बलात्काराच्या या घटनेत गोव्यातील कोणाचाही समावेश नाही, ज्यांच्यावर बलात्कार झाला त्या दिल्लीच्या आहेत आणि ज्यांनी बलात्कार केला तेही गोव्याच्या बाहेरचे आहेत, असेही परुळेकरांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, परुळेकरांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद गोव्यातील राजकीय वर्तुळात उमटले आहेत. गोवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ठिकठिकाणी परुळेकरांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला तर गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी परुळेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मात्र परुळेकरांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. बलात्कार प्रकरणाचा तपास पोलीस योग्य दिशेने करत असून अटकेत असलेल्या सगळ्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे पार्सेकर म्हणाले. घटनास्थळी एका महिलेचीही उपस्थिती होती तिचा शोध पोलीस घेत असल्याचे गोवा पोलिसांतर्फे सांगण्यात आले.