आ क्रमक, आग्रही प्रतिपादनाला शांत, अनाग्रही युक्तिवाद हा पर्याय कसा असू शकतो, हे बुधवारी टीम केन आणि माईक पेन्स यांच्यातल्या उपाध्यक्ष वादफेरीनं दाखवून दिलं. अध्यक्षपदाची पहिली फेरी ही हिलरी क्लिंटन यांचा अभ्यास आणि डोनाल्ड ट्रम्प यांची उत्स्फूर्त पण अविवेकी मांडणी यामुळे गाजली होती. त्यामुळे या दोघांचे उपाध्यक्षपदाचे दावेदार काय करतायत याकडे राजकीय विश्लेषक डोळे लावून बसले होते.

पेन्स हे ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. गृहस्थ साधा आहे. मध्यमवर्गीय घरातनं आलेत. अशा व्यक्तींत उच्चपदस्थ वर्तुळात वावरताना एक प्रकारचा कानकोंडेपणा दिसतो. पेन्स यांच्या संपूर्ण आविर्भावात तो सतत होता. त्याचवेळी केन हे मात्र आत्मविश्वासानं फुरफुरत होते. त्यात परत केन यांच्या नेत्या हिलरी या सत्तानुभवी. जागतिक राजकारणाचा, प्रशासनाचा दांडगा अनुभव. त्या अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्याने केन या वादफेरीत सतत पेन्स यांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नात होते.

परंतु ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्षीय उमेदवार पेन्स यांच्यातला फरक हा की पेन्स हे जराही केन यांच्या जाळ्यात सापडले नाहीत. ट्रम्प यांचं तसं नाही. जरा कोणी अरे म्हणाला की ते सर्वशक्तिनिशी त्याला किंवा तिला कारे म्हणायला धावतात. त्यामुळे ज्यांची दखल अध्यक्षपदाचं स्वप्न पाहणाऱ्यानं घ्यायची नसते त्यांच्याही नादाला ते लागतात आणि मुख्य मुद्दा आणि आपली पत ट्रम्प घालवून बसतात. ही बाब अनेकदा आतापर्यंत पुढे आली आहे. ती ट्रम्प यांच्यातली उणीव पेन्स यांनी बुधवारी पूर्णपणे झाकून टाकली.

हा केवळ दोन व्यक्ती वा प्रवृत्तींमधला फरक नाही. हा जगाच्या महासत्तेची सूत्रं हातात असलेले आणि ती हिसकावून घेऊ पाहत असलेले यांच्यातला संघर्ष आहे. वर्षांनुवष्रे सत्ता उपभोगून तिच्यावर मक्तेदारी सांगणारा वर्ग एका बाजूला आणि समोर त्यांना वाटेल तसे, आडवेतिडवे, प्रसंगी असभ्य प्रश्न विचारून भंडावून सोडणारा ट्रम्प आणि त्यांचा समर्थक वर्ग अशांतली ही लढाई आहे. तिचं प्रतिबिंब व्हर्जिनियातल्या लाँगवूड विद्यापीठात झडलेल्या पहिल्या आणि एकमेव अशा उपाध्यक्ष वादफेरीत चांगलंच पडलं. सीबीएस न्यूजची वृत्तनिवेदक आणि पत्रकार एलीन किहानो हिनं या चच्रेचं सूत्रसंचालन केलं. अध्यक्षीय वादफेरीप्रमाणं ही चर्चादेखील ९० मिनिटांची होती. अध्यक्षीय वादफेरीत १५ मिनिटांचे सहा भाग होते. येथे प्रत्येकी दहा मिनिटांचे नऊ. निवेदिका प्रश्न विचारत होती आणि या दोघांना प्रश्न-प्रतिप्रश्नांना वेळ दिला गेला.

आंतरराष्ट्रीय संबंध, स्थलांतरितांविषयीची भूमिका, अर्थव्यवस्था, तिच्यावरचे उपाय, इराण, रशिया अशा अनेक अंगांविषयी प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नांवर केन उत्तर देताना तडाखेबंद होते. पेन्स यांना मात्र अनेकदा बचावात्मक भूमिका घ्यावी लागत होती. ती पाहून केन अधिकाधिक आक्रमक होत गेले. ट्रम्प यांच्याविषयी प्रश्न निर्माण करत गेले. हेतू हा की पेन्स यांचा तोल जावा. याच मुद्दय़ांवर ट्रम्प यांचा तसा तो गेला होता. पण पेन्स शांत होते. अत्यंत मुद्देसूद उत्तरं देत होते. ट्रम्प यांच्यापेक्षा त्यांनी अभ्यास केला होता. आणि मुख्य म्हणजे आपण कुठे घसरू शकतो याचा त्यांना पूर्ण अंदाज होता. ती सर्व काळजी त्यांनी घेतली.

पण प्रश्न त्यांची कामगिरी कशी आहे वा झाली हा नाही. त्यांचे ज्येष्ठ ट्रम्प यांना हे सगळं मान्य आहे की नाही, हा आहे. याचं कारण गेल्या आठवडय़ातल्या पहिल्या वादफेरीत पाय घसरला तरी ते त्यापासून शिकायला तयार आहेत असं दिसत नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांची करचुकवेगिरी बाहेर काढली. १९९५ साली त्यांनी आपल्या कंपनीला ९१ कोटी ६० लाख डॉलर्सचा तोटा झाला असं दाखवून पुढची १८ वर्षे करमाफी पदरात पाडून घेतली. वास्तविक हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यावर त्यांचे वर्तन अधिक शहाणपणाचं असणं अपेक्षित होतं.

हे राहिलं बाजूलाच. ट्रम्प म्हणाले, बघा मी किती शहाणा आहे.. स्मार्ट आहे.. बघा कर कसा वाचवू शकतो.. त्या क्षणापासून ट्रम्प यांचा हा स्मार्टनेस त्यांच्याभोवती फास आवळू लागलाय. बुधवारी हिलरी क्लिंटन यांनी वार्ताहर परिषदेत ट्रम्प यांच्या याच स्मार्टनेसची खिल्ली उडवली. अमेरिकेतला साधा कामगार, शिक्षक, टॅक्सीवाला, व्यावसायिक इतकंच काय, धनाढय़ उद्योगपतीही कर भरत असताना ट्रम्प यांनी कर वाचवणं हा कोणता शहाणपणा?.. हा त्यांचा प्रश्न मतदारांना भावू लागलाय. वादफेरीत केन यांनी ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार पेन्स यांच्या या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं. तुम्हाला उपाध्यक्षपदाची उमेदवारी देताना ट्रम्प यांनी तुमची करविवरणपत्रं पाहिली, पण अजून त्यांनी मात्र स्वत:चा कर तपशील जाहीर केलेला नाही.. हे कसं? हा प्रश्न जिव्हारी लागणारा होता तरी पेन्स यांनी चतुराईने तो टाळला. या कर प्रकरणामुळे असेल पण जी काही तरंगती राज्यं आहेत, त्या राज्यांत ट्रम्प यांच्या विरोधात जनमत वळताना दिसतं. नेवाडा, ओहायो, नॉर्थ कॅरोलायना वगरे राज्यांतल्या जनमत चाचण्यांत ट्रम्प यांच्या स्पध्रेत हिलरी यांनी आज आघाडी घेतली.

या निवडणुकीत लक्षात यावी अशी बाब म्हणजे या महासत्तेच्या निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांमधला एक मुद्दा आहे तो बाराच्या भावात गेलेल्या महासत्तेचा. रशियाचा.

आणखीही महत्त्वाची अशी एक बाब आता समोर आलीये. फॉर्च्यून १०० म्हणजे अमेरिकेतल्या.. अर्थात जगातीलही.. अत्यंत महत्त्वाच्या उद्योगपतींची यादी. यातल्या एकाही उद्योगपतीनं ट्रम्प यांची तळी उचललेली नाही. किंबहुना तशी ती उचलायला नकारच दिलाय. हे सगळेच्या सगळे हिलरी यांच्या मागे उभे राहताना दिसतायत.

ट्रम्प यांचं हेच तर म्हणणं आहे. बडे उद्योगपती, प्रस्थापित, अमेरिकेतले अभिजन हे सगळे हिलरी यांना पाठिंबा देतायत. याचं कारण या सगळ्यांना हिलरी यांचं प्रेम आहे, त्यांच्याविषयी आदर आहे, असं नाही. तर या सगळ्यांचे हितसंबंध हिलरी यांच्यात आहेत. ही सर्व एकमेकांना पूरक अशी व्यवस्था आहे. हिलरी यांच्यामुळे या उद्योगपतींचं भलं होतं आणि त्या बदल्यात हे उद्योगपती हिलरी यांच्यामागे उभे राहतात. असा हा आपखुशीचा मामला आहे, मी एकटाच तो बदलू शकतो, हा ट्रम्प यांचा युक्तिवाद.

खरं आहे की तो एका वर्गाला पटतोय. हा वर्ग मोठा आहे, हेही मान्य. परंतु हा बदल तुम्ही नक्की करणार कसा, या प्रश्नाचं उत्तर ट्रम्प यांच्याकडे नाही. सुरक्षेच्या प्रश्नावर विचारलं, ते म्हणतात, माझ्याकडे पूर्ण योजना आहे.. पण मी ती आता गुप्त ठेवतोय. कर सुधारणा कशी करणार, स्थलांतर कसं रोखणार, आलेल्या स्थलांतरितांचं काय.. या सगळ्या प्रश्नांना त्यांचं एकच उत्तर. सगळ्या समस्यांना माझ्याकडे उत्तर आहे. आधी निवडून द्या.. मग काय ते सगळं सांगतो.

इथं खरी गोम आहे. ट्रम्प काय किंवा हिलरी काय. हे दोघेही व्यवस्थेचा फायदा घेत मोठे झालेले आहेत. या दोघांनीही चांगल्या अर्थानं व्यवस्थेचा आधार स्वत:साठी घेतलाय. आता यातले ट्रम्प याच व्यवस्थेला बोल लावतात. खरं तर याच व्यवस्थेनं त्यांना ९१ कोटी डॉलर्सचा कर वाचवायला मदत केली. आता ही व्यवस्था बदलायला हवी अशी हाक ते देतायत आणि लोकांना ते आवडतंय.

जगाचा इतिहास सांगतो की अशी व्यवस्था बदलाची हाक देत सत्ता मिळवणारे नंतर स्वत: याच व्यवस्थेचा भाग होतात. ट्रम्प काही याला अपवाद ठरणार नाहीत. लोकांना हे कळतंय का, हा मुद्दा तेवढा आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber