प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं अशी एक म्हण आहे. याच म्हणीला अगदी खाराखुरा प्रत्यय येण्यासारखी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील एका १९ वर्षीय मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. धक्कादायक बाब म्हणजे अपहरण झाल्याचे भासवून या दोघांनी मुलीच्या वडिलांकडे चक्क एक कोटी रुपयांची मागणी केली. मात्र पोलीस आणि या मुलीच्या पालकांनी दाखवलेल्या हुशारीमुळे दोघांचा डाव फसला आणि त्यांचे पितळ उघडले पडले.

काय घडलं?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मेहरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नगला भजना गावामध्ये सर्व प्रकार घडला आहे. गावातील १९ वर्षीय तरुणी २३ जुलै रोजी बेपत्ता झाली. त्यानंतर एका व्यक्तीला तिच्या आई-वडीलांना फोन आला. या व्यक्तीने मी तुमच्या मुलीचे अपहरण केले असून मला एक कोटी रुपये द्या तरच मी तुमच्या मुलीला सोडेल अशी धमकी दिली. या मुलीच्या पालकांनी पोलिसांना या फोनसंदर्भात माहिती दिली. फोनवरील व्यक्तीच्या भाषेचा लहेजा हा हरयाणवी भाषेसारखा होता असंही पालकांनी पोलिसांना सांगितलं.

..आणि पोलिसांना काहीतरी गडबड असल्यासारखं वाटलं

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. हे काम एखाद्या मोठ्या गुन्हेगाराने केलं आहे असं गृहित धरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र तपासादरम्यानच्या कालावधीमध्ये अपहरणकर्त्याचा वारंवार फोन येणे, त्याने मागितलेल्या खंडणीच्या रक्कमेममध्ये मोलभाव करणे, जास्त वेळ या मुलीच्या पालकांशी बोलणे यासारख्या गोष्टींमुळे पोलिसांना हे काम एखाद्या नवख्या व्यक्तीचे असल्याचे शंका आली. त्यांनी या मुलीचा मोबाइल क्रमांक ट्रेस करण्यास सुरुवात केली.

१०० मीटर अंतरावर होते

गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक राहुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी क्रमांक ट्रेस करण्यास सुरुवात केली असता फोन हा मुलीच्या मोबाइलवरुनच येत असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी ही मुलगी तिच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर पोलिसांना सापडले. या मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने हा अपहरणाचा बनाव केला होता. या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या मुलाशी प्रेम संबंध होते.

…आणि एक कोटी मागितले

एक कोटी रुपयांची गुंतवणूक करुन आपले पालक शाळा सुरु करणार आहेत हे या मुलीला समजलं होतं. त्यामुळेच तीने प्रियकराच्या मदतीने अपहरणाचा बनाव केला. पोलिसांनी मुलीला तब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. मात्र तिचा प्रियकर पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.