फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने मला अजून एक संधी द्या असं म्हटलं आहे. युजर्सची माहिती त्यांची परवानगी न घेता तिस-या व्यक्तीशी शेअर करण्याची चूक माझ्या कंपनीने केली असली तरी फेसबुक चालवण्यासाठी सध्या मीच योग्य व्यक्ती असल्याचा विश्वासही झुकेरबर्गने व्यक्त केला आहे. डेटा लीक प्रकरणाची सर्व जबाबदारी आपण घेत असल्याचं मार्क झुकेरबर्गने कॉन्फरन्स कॉलदरम्यान रिपोर्टर्सना सांगितलं. यावेळी त्याला सध्याच्या घडीला फेसबुकचं नेतृत्व करण्यासाठी तू योग्य व्यक्ती आहेस का ? असं विचारलं असता त्याने हो असं उत्तर दिलं.

केम्ब्रिज अॅनालिटीका कंपनीने फेसबुकच्या तब्बल ८.७ कोटी युजर्सचा डेटा लीक केला आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांची संख्या जास्त आहे. २००४ साली फेसबुकची स्थापना करणा-या झुकेरबर्गने पुन्हा एकदा काही त्रुटी राहिल्याचं मान्य करत पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन केलं आहे.

‘मला अजून एक संधी द्या. ही खूप मोठी चूक होती. ही माझी चूक आहे’, असं मार्क झुकेरबर्ग कॉन्फरन्स कॉलदरम्यान बोलत होता.

‘हो लोकांकडून चुका होतात आणि त्यातून ते शिकतात. चूक मान्य करणारा मी पहिला व्यक्ती आहे. आमच्या जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडल्या नाहीत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकत आहोत हेदेखील लोकांनी पाहिलं पाहिजे’, असं मार्क झुकेरबर्ग बोलला आहे.

डेटा लीक प्रकरणानंतर आपल्याला पद सोडण्यास सांगितल जात आहे याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही. पण अद्याप या प्रकरणी कोणालाही निलंबित करण्यात आलेली नाही अशी माहिती झुकेरबर्गने दिली आहे.