उड्डाण करताना लढाऊ विमान मिग-२९ धावपट्टीवरुन घसरल्याचा प्रकार बुधवारी गोव्यात घडला. विमान अचानक धावपट्टीवर वळाल्याने त्याने पेट घेतला. त्यानंतर अग्निशामन दलाने युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम केले. दरम्यान, विमान चालवणारा शिकाऊ पायलट यावेळी सुखरुप विमानातून बाहेर पडला. त्यामुळे विमानाचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे सुमारे एक तासासाठी हा विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर धावपट्टीवरील वाहतूक सुरु करण्यात आली.

ही दुर्घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धावपट्टीवरुन धावत असताना विमानाने आकाशात झेप घेण्यापूर्वी अचानक मार्ग बदलला आणि धावपट्टीच्या बाहेर पडले. हा विमानतळ हवाईदलाचा विमानतळ असून त्याचा वापर सार्वजनिक विमान वाहतुकीसाठी देखील होत आहे. या प्रकारामुळे त्यानंतरच्या सर्वच विमानांच्या उड्डाणांनाही उशीर झाला होता.