गोवा सरकारने सादर केलेल्या सुटय़ांच्या यादीतून गांधी जयंतीची (२ ऑक्टोबर) सुटी वगळली गेल्यावरून सुरू झालेल्या वादावर पडदा पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नजरचुकीने तसे झाले असावे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
गोवा सरकारने शनिवारी नववर्षांचे कॅलेंडर आणि सरकारी सुटय़ांची यादी प्रसिद्ध केली. त्यात २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुटीचा उल्लेख नव्हता. भाजपशासित गोव्यात राज्य सरकारने जाणूनबुजून ही चूक केली असल्याचा दावा काँग्रेसने केला.
काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी म्हटले की, राज्य सरकारचा हा निर्णय राष्ट्रविरोधी असून भाजपची संकुचित मनोवृत्ती दाखवणारा आहे. कोणतेही राज्य सरकार अशी चूक करू शकत नाही.