राफेल विमान खरेदीवरून काँग्रेसने मोदी यांना लक्ष्य केल्यावर पर्रिकर यांच्याबद्दल काही काळ संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. पर्रिकर यांच्या शयनगृहात राफेलच्या संदर्भातील महत्त्वाच्या फाइल्स असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे दूरध्वनीवरील संभाषण जाहीर झाले होते. काँग्रेसने या मुद्दय़ावरच भाजप आणि मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. दोनच महिन्यांपूर्वी गोवा दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी पर्रिकर यांची सचिवालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पर्रिकर यांचा हवाला देत राफेलबाबत काही विधाने केली होती. यावरूनही बराच वाद झाला होता. पर्रिकर यांनी या साऱ्यांचा इन्कार केला होता. पर्रिकर आणि गोवा हे जणू काही समीकरण होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेणारा नेता सध्या तरी भाजपकडे नाही. त्यांच्या निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे.

गोवा भाजपचा चेहरा

गोव्यात १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते. भाजपने हळूहळू या राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्या वेळी मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा चेहरा होता. लहानपणापासूनच पर्रिकर हे रा. स्व. संघात काम करीत असत. आय.आय.टी. मुंबईमधून पदवी प्राप्त केल्यावर पुन्हा त्यांनी संघाचे काम सुरू केले होते. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला शह देण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न सुरू केले. तेव्हा रा. स्व. संघाचे पदाधिकारी असलेल्या पर्रिकर यांच्याकडे भाजपची जबाबदारी सोपविण्यात आली. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे अस्तित्व कमी झाल्याशिवाय भाजपला संधी मिळणार नाही हे ओळखून भाजप आणि संघाने पावले टाकली. पर्रिकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. १९९४ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले व त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

काहीसे हट्टी असलेले पर्रिकर हे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम असायचे. त्यांच्या या भूमिकेमुळेच पक्षातही त्यांचे अनेकांशी मतभेद झाले. अगदी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तुलना त्यांनी मुरलेल्या लोणच्याशी केली होती. मोदी यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचविणाऱ्या नेत्यांच्या यादीत पर्रिकर हेदेखील होते. राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची त्यांनी फारशी इच्छा नव्हती. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिल्लीत येण्याची गळ घातली होती. पर्रिकर त्याला तयार नव्हते. पण मोदी-शहा यांच्या आग्रहापुढे पर्रिकर यांचे काही चालले नाही. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्रिपद स्वीकारले.

संरक्षणमंत्रिपदी असताना त्यांना दिल्लीत भेटण्याचा योग आला होता. तेव्हा मनाने आपण अजूनही पणजीत असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितले होते. संरक्षणमंत्रिपदाची त्यांची कारकीर्द गाजली होती. त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात भारतीच लष्कराने पाकिस्तानात लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राइक) केला होता. सध्या गाजत असलेली राफेल विमान खरेदी त्यांच्या काळातच झाली होती. संरक्षणमंत्री असतानाही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याने पर्रिकर खासगीत नाराजी बोलून दाखवीत असत. राफेल विमान खरेदीच्या वेळी वाटाघाटी करणाऱ्या संरक्षण खात्याच्या पथकाने काही आक्षेप नोंदविले होते. यावरून बराच वाद झाला होता. पर्रिकर यांचा स्वभाव लक्षात घेता त्यांना हे फारसे पटले नव्हते. यामुळेच दोन वर्षांपूर्वी गोवा विधानसभेची निवडणूक पार पडल्यावर संधी येताच पुन्हा पणजी गाठले. गोवा हीच आपली कर्मभूमी असल्याचे त्यांनी तेव्हा जाहीर केले होते.