गोव्यातील ३५ हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना शनिवारी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिगंबर कामत यांच्यासह खाण विभागाचे माजी संचालक अरविंद लोलिएनकर यांची विशेष तपास पथक चौकशी करणार आहे. खाण घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून लोलिएनकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्य सरकारने याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत कामत यांच्यासह प्रतापसिंह राणे या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही समावेश केला आहे. बेकायदेशीरपणे उत्खनन केलेल्या अनेक टन आयर्न ओरची राज्याबाहेर निर्यात करण्यास कामत यांनी परवानगी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एसआयटीने आतापर्यंत खाण विभागाचे माजी संचालक जे. बी. भिंगुई, श्याम सावंत आणि विधि विभागाच्या अधिकारी स्मिता चांदवाणी यांची चौकशी केली आहे.