थरार आणि क्षणाक्षणाला रोमांच निर्माण करणारा खेळ म्हणजे फुटबॉल. जगभरात फुटबॉलचे करोडो चाहते आहेत. फुटबॉल सामन्यात अनेकदा काही विक्षिप्त गोष्टी पहायला मिळत असतात. असंच काहीसं पुन्हा एकदा फुटबॉलच्या मैदानावर पहायला मिळालं आहे. यावेळी मैदानात होता ट्यूनीशिया संघ. सामन्यादरम्यान ट्यूनीशिया संघाच्या गोलकीपरने असं काही केलं की प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. मात्र त्यांनी त्याच्या या कल्पनेला दादही दिली. झालं असं की, ट्यूनीशियाचे अनेक खेळाडू मुस्लिम आहेत. सध्या रमझान महिना सुरु असून अनेकांचा रोजा सुरु आहे. सामना सुरु असताना आपल्या मुस्लिम सहकारी खेळाडूंना रोजा सोडता यावा यासाठी गोलकीपरने चक्क जखमी झाल्याचं नाटक करत मैदानावरच झोपी गेला. बरं हे करण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती. याआधीच्याही सामन्यात त्याने हीच युक्ती वापरली होती. पोर्तगल आणि तुर्की यांच्यासोबत त्यांचे सामने पार पडले आहेत.

दोन्हीही सामन्यात आपल्या खेळाडूंना रोजा सोडता यावा यासाठी गोलकीपरने भन्नाट शक्कल लढवली. सामना सुरु असल्याने खेळाडूंना रोजा सोडणं शक्य नव्हतं. म्हणून मग रोजा सोडण्याची वेळ होताच गोलकीपर मोऊन हसन जखमी झाल्याचा बहाणा करत मैदानावरच झोपी गेला. पंचांनीही गोलकीपर जखमी झाल्याचं समजत सामना काही वेळासाठी थांबवला. जोपर्यंत मेडिकल टीम तपासणी करण्यासाठी यायची तोपर्यंत खेळाडूंना ब्रेक मिळत असे.

सहकारी खेळाडूंनी लगेचच या ब्रेकचा फायदा घेत ज्यूस पिऊन आणि खजूर खाऊन आपला रोजा सोडला. प्रेक्षकही हे चित्र पाहिल्यालवर आश्चर्यचकित झाले होते. फिफा वर्ल्ड कपआधी हा फ्रेंडली सामना खेळवला जात होता. पहिला सामना पोर्तुगलविरोधात होता. यावेळी जेव्हा सामना २-१ वर होता तेव्हाच ५८ व्या मिनिटाला गोलकीपरने जखमी होण्याचं नाटक केलं होतं. हा सामना २-२ वर ड्रॉ झाला होता.

दुसरा सामना तुर्कीविरोधात होता. ४९ व्या मिनिटाला गोलकीपर पुन्हा एकदा मैदानावर झोपला जेणेकरुन सहकारी रोजा सोडू शकतील. हा सामनादेखील २-२ ने ड्रॉ झाला.