गुजरातची राजधानी असलेले गांधीनगर ओळखले जाते ते नियोजनपूर्ण शहरासाठी. मोठे रस्ते, दोन्ही बाजूला झाडे, चार रस्त्यांच्या चौकटीमध्ये बसवलेली सरकारी कार्यालये व कर्मचाऱ्यांची घरे.. या शहरावर सरकारची छाप आहे. चार दिशेच्या गावांमधून इथे येऊन राहिलेले कर्मचारी सोबत चालीरीती घेऊन आले असले तरी गांधीनगरच्या हवेत कार्यालयीन शिस्तीचा भागच अधिक आहे.

गेल्या निवडणुकीत गांधीनगर शहराच्या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. अर्थात गांधीनगरमध्ये ग्रामीण भागही येतो, हे अनेकदा दुर्लक्षिले जाते. गेल्या वेळी या तीनही जागा काँग्रेसच्या खाती जमा झाल्या होत्या. काँग्रेसचे आमदार भाजपच्या गळाला लागले असले तरी या भागातील ठाकोर विभागाचे वर्चस्व आणि अल्पेश ठाकोरचा काँग्रेसमधील प्रवेश यामुळे भाजपला आव्हान मिळाले आहे.

पहिल्यांदाच गांधीनगरला जाणाऱ्यांना तेथील लांब-रुंद रस्त्यांएवढेच त्यांच्या नावांचेही अप्रूप वाटते. येथील रस्त्यांना क, ख, ग, घ, च, छ, ज अशी नावे आणि १ ते ७ क्रमांक आहेत. सात वर्षांपूर्वी या रस्त्यांना आणि चौकांना इतर ठिकाणांप्रमाणेच नेत्यांची आणि हिंदू धर्माशी संबंधित तत्त्वांची नावे देण्याचा प्रयत्न झाला, मात्र आजही गांधीनगरमधील रस्ते हे मुळाक्षर आणि क्रमांकानीच ओळखले जातात. दाटीवाटीने वसलेले आणि सदासर्वकाळ माणसांचा वावर असलेल्या अहमदाबादला लगटूनच असलेले गांधीनगर मात्र त्याच्या अगदीच विपरीत आहे. अत्यंत आखीव-रेखीवपणे वसवलेल्या या शहरावर सरकारी छाप आहे.

मूळ गाव सोडून सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी राजकारणासारख्या विषयावर बोलणे टाळतात. गांधीनगरच्या एका टोकाला सेक्टर २१ मध्ये बाजार आहे. या बाजारावरही सत्ताधाऱ्यांची छाप आहे. त्यामुळे गांधीनगर हे फारसे चर्चेत येत नाही. निवडणुकीपूर्वी मात्र येथील आर्चबिशप थॉमस मॅकवान यांनी लिहिलेले पत्र बातम्यांचा विषय झाले. कडव्या राष्ट्रवादी दलाकडे राज्य जाणार नाही यासाठी प्रार्थना करा, अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही पाठवली होती. निवडणुकीच्या धामधुमीत हे प्रकरण काहीसे मागे पडले.

गांधीनगरमध्ये ९५ टक्के हिंदू असल्याने अल्पसंख्याकाची नाराजी कुठेच तीव्रपणे जाणवत नाही. आमच्या लहानमोठय़ा समस्या आहेत, मात्र त्या तर कायम असतातच. राज्य सरकारने गेल्या २० वर्षांत विकास केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे येथील विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते गिरीश ठक्कर म्हणाले. सरकार चांगले काम करत असले तरी आम्ही स्थानिक आमदाराशी संतुष्ट नाही. अनेक समस्या मांडल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद येत नाही. त्यामुळे पक्ष चांगला असला तरी बदलाची आवश्यकता आहे, असे येथील ज्वेलर्सच्या दुकानाचे मालक अल्पेशभाई सोनी म्हणाले.

विकासाअभावी नाराजी

भाजपने येथे अशोककुमार पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल हे आधी काँग्रेसकडून निवडून आले होते. भाजपने पाटीदार उमेदवार उभा केला असून काँग्रेसने ठाकोर समाजातील उमेदवाराला निवडणुकीत उतरवले आहे. जुगाजी ठाकोर हे गांधीनगर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. गांधीनगर दक्षिणेतून भाजपचे शंभुजी ठाकोर तर काँग्रेसचे गोविंद सोळंकी निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवर भाजपचे प्राबल्य असले तरी या विकासाशी फारसे नाते नसलेल्या शेजारच्या तीन विधानसभा मतदारसंघात मात्र निवडणूक चुरशीची होईल.

विधानसभा मतदारसंघ असलेल्या कलोल गावात पारंपरिक चनिया चोली तयार करण्याचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर आहे. राज्याच्या विविध भागांत ही चनिया चोली विक्रीसाठी पाठवली जाते. गांधीनगरच्या ब्रॅण्डेड शोरूमच्या बाजारात मात्र ती  मिळत नाही. बाजूलाच असलेल्या कलोलमधील परंपरांशी जसा गांधीनगर शहराचा संबंध नाही, तसाच येथील विकासाची गंगा कलोलपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळेच कदाचित पाच वर्षांपूर्वी येथे काँग्रेसचा आमदार निवडून आला होता. दाहेगाम आणि मनसा या दोन जागाही काँग्रेसनेच जिंकल्या होत्या. या तीनही गाव परिसरात असलेला ठाकोर समाज काँग्रेसच्या पाठीशी आहे. ओबीसीचा नेता असलेल्या अल्पेश ठाकोरनेही या भागात विशेष लक्ष दिले आहे. या तीनही जागा टिकवणे काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरेल.

लष्करी कामाच्या निमित्ताने अनेक राज्यात काम करून गेली काही वर्षे गुजरातमध्ये असलेला अकोल्याचा एक तरुण गांधीनगरच्या बाजारात भेटला. गेल्या काही वर्षांत येथील मित्रमंडळी व लोकांशी झालेल्या चर्चेनंतर त्याला आकलन झाले ते असे.. ‘गोध्राकांड व त्यानंतरच्या दंगली याचा खूप मोठा प्रभाव लोकांवर आहे. त्यामुळे ते सरकारवर रागावतील, पण निवडणुकीत मत देताना या इतिहासाचा विचार करतील..’