गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘आघाडी’बाबतची चर्चा फिस्कटली आहे. आघाडीसाठी काँग्रेस गंभीर नसून त्यांनी आघाडीचा निर्णय घेण्यासाठी चालढकल केली, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे गुजरातमध्ये आघाडी होणार अशी चिन्हे होती. काँग्रेसने रविवारी रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ७७ उमेदवारांना यात स्थान मिळाले आहे. काँग्रेसने यादी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्हाला गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करायची होती. आम्ही चर्चेसाठी पुढाकारही घेतला होता. मात्र काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नव्हती, म्हणूनच त्यांनी चालढकल केली, असा आरोप त्यांनी केला. आम्ही गुजरातमध्ये स्वबळावर लढणार असून आम्ही चांगली कामगिरी करु अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

गुजरातमध्ये २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. बहुसंख्य उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. यानंतर २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने फक्त १० जागांवर निवडणूक लढवली. यात ३ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. यानंतर २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा २ जागांवर विजय झाला होता.