गुजरातमधील अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली असून गुजरातच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मतदारांना आवाहन केले. गुजरातमध्ये परिवर्तनाची सुरुवात झाली असून तुमचे एक मत लोकशाहीच्या पायाला आणखी सशख्त करणार आहे. गुजरातच्या जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी राज्याच्या भविष्यासाठी मतदान करावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरुन मतदारांना आवाहन केले आहे. गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदारांनी विक्रमी मतदान करावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सामील व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातच्या विकासासाठी मतदान करा, असे आवाहन अरुण जेटलींनी केले. तर नरेंद्र मोदींच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावला. गुजरातच्या भल्यासाठी मतदान करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गुजरातमधील ६ कोटी मतदारांचा विजय होणार हे निश्चित आहे. मला निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी मतदानाला सुरुवात होताच आनंदीबेन पटेल, अमित शहा, हार्दिक पटेल, शंकरसिंह वाघेला आदी नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.