सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर असल्याचा निर्वाळा देणाऱ्या जागतिक बँकेच्या अहवालात महाराष्ट्राचा मात्र आठवा क्रमांक लागला आहे.
भारतातील कोणती राज्ये उद्योगांसाठी चांगली आहेत याबाबतचा अहवाल जागतिक बँकेने सोमवारी सादर केला. बँकेने दिलेल्या मानांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेला गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर फेकला गेला असून अरुणाचल प्रदेश यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
या राज्यांना लालफीतशाहीचा अडथळा दूर करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवली जाते. मोदी सरकारच्या विनंतीवरून केपीएमजीच्या मदतीने तयार करण्यात आलेला हा अहवाल जागतिक बँकेच्या वार्षिक ‘डुइंग बिझिनेस रिपोर्ट’च्या आधी आल्यामुळे त्याला महत्त्व मिळाले आहे. जगातील देशांची क्रमवारी लावणारा जागतिक बँकेचा तो अहवाल पुढील महिन्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी १८९ देशांमध्ये पाकिस्तान व इराणनंतर भारताचा असलेला १४२ वा क्रमांक २०१७ पर्यंत ‘टॉप ५०’पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.