बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांच्या शिक्षेचा फैसला आज (सोमवारी) होणार आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास रोहतकमधील तुरुंगात ही सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग यांना गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. १५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. आज सीबीआयचे विशेष न्यायालय बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावणार आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरमित राम रहिम यांना न्यायालयात न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संदीप सिंह हे रोहतकमधील सुनरिया कारागृहात जाऊन शिक्षा जाहीर करतील. बाबा राम रहिम यांना सात किंवा दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळू नये यासाठी हरयाणा, पंजाबमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रोहतकमध्ये निमलष्करी दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून डेरा सच्चा सौदाची सर्व केंद्रे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. तसेच ‘डेरा’च्या सर्व पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. हरयाणामधील शाळा, महाविद्यालये आज बंद असतील. हरयाणाकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाजवळ दोन महिलांकडून सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या नाकेबंदीदरम्यान या महिलांना पकडण्यात आले. या महिलांची कसून चौकशी सुरु असून त्या ‘डेरा’शी संबंधीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.