दिल्लीच्या सीमांजवळ मागील एका महिन्यापासून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांजवळ आंदोलन करत आहेत. दरम्यान याच कालावधीमध्ये हरयाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल आज समोर आले. भाजपा आणि जेजेपी युतीला शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी युतीला सोनीपत आणि अंबालामध्ये महापौर पद गमावावं लागलं आङे. तसेच उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीचा हिसारमधील उकालना आणि रेवारीमधील धरुहेरा येथे आपल्या घरच्या राजकीय मैदानामध्येच पराभव झालाय. पुढील वर्षी निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीचा फटका भाजपा-जेजेपी युतीला बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

अंबाला, पंचकूला, सोनीपत, रेवारीमधील धरुहेरा, रोहतकमधील सांपला आणि हिस्सारमधील उकालनामध्ये रविवारी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान झालं. आज सकाळपासूनच या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली. काँग्रेसने सोनीपमध्ये १४ हजार मतांनी विजय मिळवला. निखिल मदान हे सोनीपतचे महापौर म्हणून कायम राहणार आहेत. काँग्रेसने शेतकरी आंदोलनामुळे जनतेत असलेल्या संतापामुळे भाजपाचा पराभव झाल्याचा दवा केला आङे. काँग्रेसचे नेते श्रीवत्स यांनी ट्विटरवरुन, “काँग्रेसला मोठ्या फरकारने सोनीपतमध्ये महापौर निवडणुकीमध्ये विजय मिळाला. काँग्रेसला ७२ हजार १११ तर भाजपाला ५८ हजार ३०० मतं मिळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे सोनीपत सिंघू बॉर्डरला लागूनच आहे आणि ते शेतकरी आंदोलनाचं एक केंद्र आहे,” असं म्हटलं आहे.

अंबालामध्ये हरयाणा जनचेतना पार्टीच्या शक्ती राणी शर्मा महापौरपदी विराजमान होणार आहेत. त्यांनी आठ हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. शक्ती राणी शर्मा या हरयाणा जनचेतना पार्टीचे अध्यक्ष आणि माजी काँग्रेस नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या विनोद शर्मा यांच्या पत्नी आहेत. जेसिकालाल हत्याकांड प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला मनू शर्मा हा या दोघांचाच मुलगा आहे.

भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या जेजेपीचा रेवारी आणि हिस्सारमध्ये पराभव झाला आहे. जेजेपीचा जुना मित्र पक्ष असणाऱ्या शिरोमणि अकाली दलने शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन एनडीएमधून काढता पाय घेतला आणि जेजेपीच्या अडचणींमध्ये वाढ झाली. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनाही शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात आला नाही तर आपण एनडीए सोडू अशी घोषणा केली होती.

मागील महिन्यामध्ये शेतकरी आंदोलनातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी लाठीचार्जही झाला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारविरोधात सामान्यांमध्ये रोष वाढल्याचे चित्र दिसून आलं. त्याचीच प्रचिती आता या निवडणुकीच्या निकालांमधून पुन्हा दिसून आलीय असं जाणार सांगतात.