News Flash

शेतकरी आंदोलन : “स्वत:ला राष्ट्रवादी म्हणणाऱ्या या सरकारला…”; ना’राजीनाम्या’मुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपाला सोडचिठ्ठी

आपला शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे, म्हणत सोडली भाजपाची साथ

हरयाणामधील (Haryana) भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव असणाऱ्या रामपाल माजरा (Rampal Majra) यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शेतकरी आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचे माजरा यांनी जाहीर केलं आहे. इतकच नाही तर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पूर्ण समर्थन आहे. मी या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहे, असंही माजरा यांनी म्हटलं आहे. हा कायदा केवळ शेतकरीविरोधी नसून तो अंमलात आणल्यास त्याचा समाजातील इतर घटकांवरही प्रतिकूल परिणाम होईल अशी भीतीही माजरा यांनी व्यक्त केलीय.

नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुनच आपलं मत हे पक्षाच्या मतापेक्षा वेगळं असल्यानेच आपण पक्ष सोडल्याची माहिती माजरा यांनी दिली आहे. तीनदा आमदार राहिलेल्या माजरा यांनी इंडियन नॅशनल लोकदलला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माजरा यांनी नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं होतं. किमान आधारभूत मूल्य भविष्यामध्ये कायम राहील की नाही यासंदर्भात माजरा यांनी शंका उपस्थित केली होती.

आणखी वाचा- कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या करेन – राकेश टिकैत

राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजरा यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत जे काही झालं, जी हिंसा झाली त्याचा मी निषेध करतो. माजरा यांनी यावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. हे सरकार स्वत:ला राष्ट्रवादी सरकार म्हणवून घेतं त्यांना देशाची आन बान शान असणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भातील मर्यादा कायम राखता आली नाही, अशी खंतही माजरा यांनी व्यक्त केली. दिल्लीत झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त करताना माजरा यांनी घडलेल्या घटनेसाठी गुप्तचर विभाग सर्वाधिक दोषी आहे असंही माजरा यांनी म्हटलं आहे.

Video : घुसखोर असल्याचं म्हणत शेतकरी नेत्यांने लगावली कानशिलात

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीत शिरलेल्या घुसखोरांबद्दल गुप्तचर यंत्रणांना काहीच माहिती नव्हती याबद्दल माजरा यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच घडलेल्या घटनेसाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार असल्याचंही माजरा यांनी म्हटलं आहे. जे काही लाल किल्ल्यावर झालं त्याने एक भारतीय म्हणून मी खूप दु:खी आहे. सरकार सर्व बाजूंनी पराभूत झालीय. हिंसा करणाऱ्यांना थांबवण्यासाठी सरकारने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या. नियोजित कटानुसार एका पंथाचा झेंडा तिथे फडकवण्यात आला, असंही माजरा यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 8:00 am

Web Title: haryana former 3 time mla rampal majra leaves bjp over farm laws scsg 91
Next Stories
1 स्टॅण्ड-अप कॉमेडियन फारुकी याचा जामीन अर्ज फेटाळला
2 राम मंदिराच्या उभारणीस विलंब!
3 सर्व आव्हानांचा सामना करण्यास भारत सक्षम – मोदी
Just Now!
X