राजस्थानच्या मानसिंग राजघराण्याच्या मालमत्तेवरुन निर्माण झालेल्या वादाला उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या राजघराण्याच्या गायत्रीदेवी यांची सर्व मालमत्ता त्यांच्या देवराज आणि ललित्यकुमारी या नातवंडांनाच देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने मंगळवारी दिला.
गायत्रीदेवी आणि सवाई मानसिंग यांचा मुलगा जगत सिंग यांनी आपल्या मालकीचे ९९ टक्के समभाग याच राजघराण्याच्या जय महाल हॉटेल आणि रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये गुंतवले होते, आपल्या पश्चात हे समभाग आपल्या आईच्या म्हणजे गायत्रीदेवींच्या नावे हस्तांतरित करावेत, असे मृत्युपत्र त्यांनी केले होते. काही वर्षांपूर्वी जगत यांच्या निधनानंतर हे समभाग गायत्रीदेवींच्या नावे झाले, त्यानंतर गायत्रीदेवींनीही मृत्युपत्र तयार करून आपल्या पश्चात हे समभाग आपल्या देवराज आणि ललित्यकुमारी या नातवंडांनाच मिळावेत, अशी व्यवस्था केली होती. गायत्रीदेवी यांचे जुलै २००९ मध्ये निधन झाल्यानंतर या मृत्युपत्राच्या आधारे त्यांच्या मालकीचे समभाग या नातवंडांना मिळणे अपेक्षित होते, मात्र सवाई मानसिंग यांच्या सावत्र मुलांनी व अन्य वारसदारांनी या मृत्युपत्रास आक्षेप घेतला व न्यायालयात त्यास आव्हान दिले. दरम्यान, संबंधित हॉटेलमधील हे समभाग देवराज आणि ललित्यकुमारी यांच्या नावे हस्तांतरित करण्यास कंपनी लॉ बोर्डानेही परवानगी नाकारली.
या पाश्र्वभूमीवर, उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कंपनी लॉ बोर्डाचा निकाल रद्दबादल ठरवला. कंपनी लॉ बोर्डाचा निर्णय नियमबाह्य़ असल्याने तो रद्द करण्यात येत आहे आणि गायत्रीदेवी यांचे सर्व समभाग देवराज आणि ललित्यकुमारी यांनाच देण्यात यावेत, असा निकाल न्यायालयाने दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 6:16 am