काश्मीरमधील सध्याच्या स्थितीवरुन मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पाकिस्तानकडून होत असलेली आरडाओरड हा निव्वळ ढोंगीपणा असून पाकिस्तान निर्लज्ज आहे. पाकिस्तानने मागील ७२ वर्षांपासून बलुचिस्तानवर बेकायदेशीररित्या ताबा मिळवला आहे, असा आरोप बलुच नॅशनल मुव्हमेंटचे प्रवक्ते हमाल हैदर यांनी केला आहे. हैदर यांच्याबरोबरच आज पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक बुलचिस्तान समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवरुन पाकिस्तानवर टिकेची झोड उठवली आहे.

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. संतापलेल्या पाकिस्तानने भारताबरोबरचे व्यापारी संबंध बंद करण्यापासून ते समझोता एक्सप्रेस थांबवण्यापर्यंत अनेक टोकाचे निर्णय घेतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र बुलुचिस्तान मोहिमेच्या प्रवक्त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “पाकिस्तानने मागील ७२ वर्षांपासून अनधिकृतरित्या बलुचिस्तानवर ताबा मिळवला आहे. सर्व कायद्यांचे उल्लंघन करुन पाकिस्तानने इतक्या वर्षांमध्ये बलुचिस्तानचे समर्थन करणाऱ्या अनेक बलुची नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठार मारले आहे,” असा आरोप हैदर यांनी केला आहे.

“इतर देशांप्रमाणे बलुचिस्तानही एक स्वतंत्र देश होता. ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या या प्रदेशाला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळण्याच्या तीन दिवस आधी स्वातंत्र्य मिळाले. मात्र पुढील सहा महिन्यांमध्ये आम्ही आमचे स्वातंत्र्य गमावून बसलो. बलुचिस्तानचा शासक असणाऱ्या मीर अमह यार खान याने बलुचिस्तानचा भूप्रदेश पाकिस्तानमध्ये समाविष्ठ करुन घेण्यात यावा असा प्रस्ताव मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारकडे केला. हा प्रस्ताव पाकिस्तानच्या राज्यसभेत आणि लोकसभेत मांडण्यात आलेला. मात्र दोन्ही सदनांनी बलुचिस्तानचा पाकिस्तानमध्ये समावेश करुन घेण्याचा हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर इस्लामच्या नावाखाली बलुचिस्तानमधील जनतेला आपल्या बाजूने करुन घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र त्यामध्ये यश न मिळाल्याने पाकिस्तानने २७ मार्च १९४८ रोजी लष्करी बळाचा वापर करुन स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध जात हा प्रदेश बळकावला,” असं हैदर यांनी म्हटलं आहे.

“पाकिस्तानी लष्कराने केवळ बलुचिस्तानमधील नेत्यांचीच नाही तर सिंध आणि पश्तून नेते, शिक्षक, वकील आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्यांचीही हत्या केली आहे,” असा आरोप हैदर यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कराने हा प्रदेशात ताब्यात घेतल्यापासून त्यांनी येथील हजारो स्थानिकांची निर्घृणपणे हत्या केली आहे. आपले हक्क आणि हा प्रदेश स्वतंत्र करण्याची मागणी करणाऱ्यांची पाकिस्तानी सैन्याकडून हत्या केली जात असल्याचे हैदर सांगतात.