निवडणुकीनंतर प्रथमच जाहीररीत्या निराशा व्यक्त

अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर एखाद्या चांगल्या पुस्तकात डोके खुपसून बसावे आणि कधीच घराबाहेर जाऊ नये असे मला वाटत होते, अशा शब्दांत माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी प्रथमच त्यांची निराशा उघड केली.

चिल्ड्रेन्स डिफेन्स फंडाच्या ‘बीट दि ऑड्स’ या उत्सवात सहभागी झालेल्या हिलरी यांनी पराभवानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला, त्या वेळी त्या भावुक झाल्या. तुझ्या मुलीने काय साध्य केले आहे, हे बालपणीच लहान मुलगी म्हणून सोडण्यात आलेल्या माझ्या आईला मला सांगायचे होते, असे त्या म्हणाल्या.

इथे येणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती हे मी मान्य करते. गेल्या आठवडय़ात काही प्रसंग असे आले की केवळ पुस्तकांमध्ये डोके घालून बसावे किंवा कुत्र्यांसोबत खेळत राहावे आणि कधीच घर सोडून जाऊ नये असे मला वाटत होते, असे माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या क्लिंटन म्हणाल्या.

८ नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी आपल्यात तीव्र मतभेद असले, तरी हार मानू नका असे आवाहन हिलरी यांनी त्यांच्या भाषणात आपल्या समर्थकांना केले.

निवडणुकीच्या निकालामुळे तुम्हाला आत्यंतिक निराशा झाली आहे हे मला माहीत आहे. मी तर इतकी निराश झाली आहे की, ती निराशा मी कधीच व्यक्तही करू शकत नाही. पण आपल्या देशावर विश्वास ठेवा, आपल्या मूल्यांसाठी लढा द्या आणि कधीही प्रयत्न सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. मला वेळेत घरी परत जाऊन आई डोरोथी हिला माझ्या कर्तृत्वाबद्दल सांगायचे असल्याचे त्या म्हणाल्या.

हिलरी यांचे भाषण म्हणजे काही अंशी त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब आणि काही अंशी ट्रम्प प्रशासनाचा सामना करण्यासाठी बळकट राहण्याचा निर्धार व्यक्त करणारे होते, असे मत सीएनने व्यक्त केले.