हॉलिवूडचा सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. ते ४३ वर्षांचे होते. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते. अखेर याच कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बोसमन हे मार्वल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर’मधून विशेष लोकप्रिय झाले होते.

बॉसमॅन यांनी लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांच्या सोबत होते. बोसमन हे कोलोन कॅन्सरने त्रस्त होते. “ते खरंच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, बोसमन यांनी ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटात सम्राट टी चाला ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. तसंच त्यांनी ‘42’,‘Get on Up’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.