News Flash

‘मदिबां’मुळे करुणेचा वारसा चिरंतन राहिला

दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी करुणा आणि क्षमाशीलतेचा खरा अर्थ जगाला शिकविला त्यामुळे त्यांचा हा ऐतिहासिक वारसा जगभरात चिरंतन राहील याबद्दल भारतीयांच्या मनात तिळमात्र

| December 11, 2013 01:21 am

दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी करुणा आणि क्षमाशीलतेचा खरा अर्थ जगाला शिकविला त्यामुळे त्यांचा हा ऐतिहासिक वारसा जगभरात चिरंतन राहील याबद्दल भारतीयांच्या मनात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले असून मंडेला यांचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला आहे.
नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी ज्या वक्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे त्यामध्ये मुखर्जी यांचा समावेश आहे. भारत सरकार आणि जनतेचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत. दक्षिण आफ्रिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला असून आपली जी हानी झाली आहे त्यामध्ये आम्ही सर्व भारतीय सहभागी आहोत, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मुखर्जी यांच्यासमवेत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज याही दक्षिण आफ्रिकेला रवाना झाल्या आहेत. एफएनबी स्टेडियमवर मुखर्जी यांचे आगमन होताच आणि त्यांचे नाव पुकारताच सर्वानी उभे राहून त्यांचे स्वागत केले. मंडेला यांचे निधन म्हणजे भारताच्या दृष्टीने एका महात्म्याचे निर्वाण आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
मंडेला यांनी आयुष्यभर त्याग केला आणि देशवासीयांसाठी अशक्य असलेले उद्दिष्ट साध्य केले आणि त्यांच्या वारशाने जग समृद्ध झाले आहे. भारतात त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे सदैव कौतुक झाले. भारतीयांसाठी त्यांच्या मनात असलेले प्रेम आणि मित्रत्वाच्या भावनेचा त्यांनी पेटविलेला नंदादीप भारतीयांच्या मनात सदैव तेवत राहील, असेही राष्ट्रपती म्हणाले.

इतिहासातील अत्युच्च व्यक्तिमत्त्व!
महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत ज्यांचे नांव आदराने घेतले जावे असे नेल्सन मंडेला हे इतिहासातील अत्युच्च व्यक्तिमत्व होते आणि राहील, अशा भावपूर्ण शब्दांत अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांनी आफ्रिकेचे दिवंगत राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘या माणसाने जे केले त्याला इतिहासात तोड नाही. एका अखंड राष्ट्राला न्यायापर्यंत सुखरूप नेणे आणि त्याच वाटेवर कायम ठेवणे हे असामान्य कार्य आहे’, असे ओबामा म्हणाले. मेंढपाळीचे काम करणारा, सत्तेशी दुरान्वये संबंध नसणारा थेंबू आदिवासी जमातीतील एक तरुण विसाव्या शतकातील स्वातंत्र्याचा उद्गाता होतो, हेच अद्भुत आहे’, असेही ओबामांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2013 1:21 am

Web Title: homage to nelson mandela world leaders celebrate mandelas legacy call him giant of history
टॅग : Nelson Mandela
Next Stories
1 दिल्लीत पुन्हा निवडणूक ?
2 मनमोहन यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान नेमण्यात मोठी चूक
3 ‘टू जी प्रकरणी काँग्रेस निर्लज्ज’
Just Now!
X