संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. जपानच्या मदतीने युएईने ‘होप मार्स मिशन’ अंतर्गत मंगळाचा अभ्यास कराण्यासाठी पाठवण्यात आलेल्या यानाचे जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे. युएईच्या अंतराळ संशोधन संस्थेनेच हे प्रक्षेपण यशस्वी ठरल्याची माहिती दिल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर २०२१ मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटलं आहे. १.३ टन वजनाचे हे यान ५० कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.

काय आहे हे होप मिशन?

होप मिशनच्या माध्यमातून मंगळाच्या वातारवणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक हवामानासंदर्भात अभ्यास करणारा उपग्रह मंगळावर पाठवण्यात आला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अस्तित्व कसं संपुष्टात आलं यासंदर्भातील महत्वाची माहिती मिळणार आहे. मंगळावरील हवा, पाण्याचा अंश आणि मातीचाही या उपग्रहामार्फत अभ्यास केला जाणार आहे. मंगळ ग्रहासंदर्भातील बरीच नवीन माहिती या उपग्रहाच्या मदतीने मिळणार आहे. मागील लाखो वर्षांमध्ये मंगळाच्या रचनेमध्ये कसा बदल झाला आहे याचाही अभ्यास या माहितीच्या आधारे करता येणार आहे.

यामधून काय माहिती मिळणार?

होप मिशनच्या माध्यमातून एक हजार जीबीहून अधिक नवीन माहिती मिळणार असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ही माहिती जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या २०० हून अधिक वैज्ञानिकांना अभ्यासासाठी मोफत देण्यात येणार आहे. मंगळाचा भूतकाळ आणि भविष्यकाळाचा अंदाज या मोहिमेमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे लावता येणार आहे. या माध्यमातून पृथ्वीचे भविष्य काय असेल आणि मंगळावर मानवाला राहता येईल का यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी महत्वाची माहिती या मोहिमेतून मिळणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश सापडल्याचे दावे करण्यात आल्यानंतर मंगळाच्या वातावरणामध्येही पाण्याचा अंश आहे का आणि असला तरी कशाप्रकारची जीवसृष्टी आधी मंगळावर अस्तित्वात होती किंवा भविष्यात कशाप्रकारे ती अतित्वात येऊ शकते याचा अभ्यास होपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

युएईचा हेतू काय?

मंगळासंदर्भात मानवाला अधिक माहिती कळावी आणि या मोहिमेमधून मिळालेली माहिती सर्वांना उपलब्ध करुन देत संशोधनासंदर्भात जगभरातील देशांमध्ये परस्पर सहाकार्याचे वातावरण तयार करण्याचा युएईचा विचार आहे. तसेच अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये संयुक्त अरब अमिरातही मोहीम पाठवण्यासाठी सक्षम असल्याचे या माध्यमातून दाखवून द्यायचे आहे. युएईमधील येणाऱ्या पिढ्यांनाही अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याच्या संधी उपलब्ध असल्याचे होपच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा युएईचा विचार आहे.