पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्याअंतर्गत ह्य़ुस्टन येथे आयोजित केलेल्या ‘हाउडी मोदी’ मेळाव्याला अनिवासी भारतीयांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. एनआरजी स्टेडियमवर पार पडलेल्या मोदींच्या या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र या मेळाव्यादरम्यान मोदींनी अमेरिकन सिनेटचे सदस्य (खासदार) असणाऱ्या जॉन कॉर्निन यांच्या पत्नीची एका खास कारणासाठी चक्क माफी मागितली. जॉन यांची पत्नी सँण्डी यांचा रविवारी (२२ सप्टेंबर रोजी) वाढदिवस होता. तरीही मोदी ‘हाउडी मोदी’ मेळाव्याला जॉन हजर राहिले. त्यामुळेच मोदींनी सँण्डी यांची माफी मागत त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. हा आगळावेगळा संवाद ऐकून मोदींच्या बाजूला उभ्या असणाऱ्या जॉन यांनाही हसू आवरले नाही. यासंदर्भातील व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊण्टवरुनच ट्विट करण्यात आला आहे.

सॅण्डी यांना शुभेच्छा देताना मोदींनी तुमच्या वाढदिवासच्या दिवशी तुमचे पती माझ्याबरोबर असल्याने तुम्हाला इर्षा वाटत असेल असे मजेदार वक्तव्य केले. ‘मी तुमची माफी मागतो कारण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुमचे पती माझ्याबरोबर या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. तुम्हाला आज माझ्याबद्दल मत्सर वाटत असणार हे स्वाभाविक आहे. तुम्हाला सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा,’ असं म्हणत मोदींनी सँण्डी यांना शुभेच्छा दिल्या.

जॉन हे टेक्सास प्रांतातून सिनेट सदस्य आहेत. सँण्डी आणि जॉन यांचे ४० वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना दोन मुली आहेत. जॉन हे मोदींच्या ‘हाउडी मोदी’ मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या रिपब्लिक आणि डेमोक्रॅटीक पक्षाच्या खासदारांपैकी एक होते. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी ५० हजार अनिवासी भारतीय आणि हजारो स्थानिक नागरिक एनआरजी स्टेडियमवर उपस्थित होते.