भारतीय वायुसेना लढाऊ विमानांची कमतरता आता भरून काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी वायुसेनकडून ३३ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे. या प्रस्तावानुसार वायुसेना २१ ‘मिग-२९’ व १२ ‘सुखोई -३०’ अशी एकूण ३३ लढाऊ विमानं खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे. वायुसेनेच्या या प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर वायुदलास मोठी बळकटी मिळणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानलाही धडकी भरणार हे निश्चितच आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. पुढील काही आठवड्यात संरक्षण मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि या बैठकीत वायुसेनेकडून लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. गत काळातील विविध दुर्घटनांमुळे वायुसेनेकडील लढाऊ विमानांची संख्या घटली आहे. त्यामुळे वायुसेना १२ सुखोई एमकेआय लढाऊ विमानांची खरेदी करून ही घट भरून काढण्याची शक्यता आहे.

याशिवाय वायुसेनेचा रशियाकडून २१ ‘मिग-२९’ विमानं खरेदीचाही मानस आहे. वायुसेनेच्या नव्या लढाऊ विमानांच्या गरजेच्या पुर्ततेसाठी रशियाने आपल्या ‘मिग-२९’ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव दिला होता. ही सर्व विमानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी असणार आहेत.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे या विमानांच्या खरेदीची बोलणी बऱ्यापैकी पुढे गेली आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वायुसेना हा व्यवहार पूर्ण करू इच्छित आहे. भारतीय वायुसेनेकडे मिग -२९ चे तीन स्क्वॉड्रन आहेत. ज्यांना वेळोवेळी अद्यावत केले जाते.