तीन वर्षांपूर्वी टिहरी जिल्ह्य़ात एक पूल बांधकाम चालू असताना कोसळून आठ जण मरण पावल्याच्या प्रकरणी आयआयटी रूरकीच्या दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे. विपुल प्रकाश व विजयकुमार गुप्ता अशी या प्राध्यापकांची नावे आहेत. ते आयआयटी रूरकीच्या नागरी अभियांत्रिकी विभागात काम करतात. त्यांना रूरकी येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून काल सायंकाळी अटक करण्यात आली, असे हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक स्वीटी अग्रवाल यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. कारण ते न्यायालयात अनुपस्थित राहिले होते. या दोन अभियंत्यांनी टिहरी जिल्ह्य़ातील चौरस येथे अलकनंदा नदीवर असलेल्या पुलाचा आराखडा तयार केला होता. २०१२ मध्ये बांधकाम चालू असताना हा पूल कोसळला होता. दरम्यान या पुलाचे बांधकाम करणाऱ्या दोन कंपन्यांच्या मालकांना गेल्या गुरूवारी अटक करण्यात आली आहे. प्राध्यापकांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले असल्याचे कीर्तीनगर पोलिस स्टेशनचे प्रमुख निरीक्षक चंदन सिंह बिश्त यांनी सांगितले. या प्रकरणात तेथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
पुलाचे बांधकाम कोसळल्याप्रकरणी आयआयटीच्या दोन प्राध्यापकांना अटक
विपुल प्रकाश व विजयकुमार गुप्ता अशी या प्राध्यापकांची नावे आहेत.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 08-09-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit professors arrested in bridge collapse case