इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबधित फसीह महमूद याच्यावर शुक्रवारी दुपारी तिहार कारागृहात दुसऱ्या कैद्याने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. २०१२ मध्ये फसीह याला सौदी अरेबियातून भारतात पाठविण्यात आले होते.
अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तिहार कारागृहातील दोन क्रमांकाच्या कोठडीत फसीहवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा  आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. तर कारागृह प्रशासनाने दुसऱ्या एका कैद्यासोबत झालेल्या झटापटीत तो किरकोळ जखमी झाल्याचे स्पष्ट केले.
   फसीह आणि दुसरा कच्चा कैदी हर सिम्रन हे दोघे आपापल्या नातेवाईकांना भेटून पुन्हा आपल्या कोठडीत जात होते. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. या वादावादीतून हरसिम्रन याने फसीहला ढकलले आणि मारले. त्यानंतर फसीह त्याला मारण्यासाठी धावला असता कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडून दोघांना थांबविले. या भांडणात फसीहच्या पायाला दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्याला परत पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे अधिकारी सुनिल गुप्ता यांनी दिली.
शनिवारी जेव्हा फसीहला सुनावणीकरिता न्यायालयात चाकाच्या खुर्चीवरून आणल्यानंतर त्याच्या वकिलाच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर फसीहचे वकील महमूद प्राचा यांनी त्याच्या जिवास धोका असल्याचे सांगितले. दरम्यान, २२ ऑक्टोबर २०१२ मध्ये फसीह जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती.