माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्टीकरण
पंतप्रधान असताना आपल्यासमोर अनेक समस्या होत्या, त्यामुळे कोळसा खाण वाटपाबाबत आपण वेळोवेळी कोणते आदेश दिले ते स्मरणात ठेवणे, अशक्य असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सीबीआयपुढे स्पष्ट केले.
कोळसा खाण वाटपप्रकरणी तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. पारख यांनी वेळोवेळी कोळसा मंत्री म्हणून निर्णय घेण्यासाठी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे समजावून सांगणे आवश्यक होते. याच वेळी २००५ मध्ये हिंदाल्को कंपनीला खाण वाटप करण्याबाबत चर्चा सुरू होती. हिंदाल्कोचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांना कोळसा खाण वाटपाबाबत पत्र लिहिताना पारख यांचा सल्ला घेण्यात आला होता. या प्रकरणी मला सल्ला देण्यास पारख हे प्रमुख अधिकारी होते, असेही मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. जानेवारीमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदविला होता. हिंदाल्को या कंपनीला अनधिकृतरीत्या कोळसा खाण वाटप केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू आहे.
ओडिशातील तालाबारा येथील कोळसा खाणींचे वाटप करताना कुठलाही दबाव नसल्याचे सांगून मनमोहन सिंग म्हणाले की, या खाणींचे वाटप करताना कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्याशी चर्चा करून कुठलीही गडबड न करता निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाण घोटाळाप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.