भारत आणखी एखादा स्ट्राइक करु शकतो अशी भिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते अशी शक्यता इम्रान खान यांनी बोलून दाखवली. भारत-पाकिस्तानवर अजूनही युद्धाची छाया आहे कारण मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते असे इम्रान म्हणाले.

धोका अजून संपलेला नाही. भारतातील लोकसभा निवडणुकीपर्यंत तणाव कायम राहिल. भारताने कोणतेही आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही सज्ज आहोत असे इम्रान म्हणाले. भारतातील लोकसभा निवडणुका संपेपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधात तणाव कायम राहील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान संबंधात तणाव अजूनही कायम आहे. १४ फेब्रुवारीला पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये जैशच्या तळावर एअरस्ट्राइक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानची फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी भारताच्या फायटर विमानांनी त्यांना पिटाळून लावले. २७ फेब्रुवारीला दोन्ही देशांमधील तणाव सर्वोच्च पातळीला पोहोचला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्परांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी केली होती.