‘नया पाकिस्तान’चे स्वप्न दाखवत पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापन करणारे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक झालीय. पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसोंदिवस वाढत असून आता देशाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी असणारी एक गोष्ट गहाण ठेवण्याची वेळ इम्रान खान सरकारवर आली आहे. पाकिस्तान सरकार आता ५०० अब्ज रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांच्या बहीणीच्या नावाने असणारं लोकप्रिय पार्क गहाण ठेवण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान सरकार ५०० अब्ज रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी इस्लामाबादमधील एफ नाईन सेक्टरमधील सर्वात मोठं पार्क गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे पार्क गहाण ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी (२६ जानेवारी रोजी) कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

पाकिस्तान सरकार जे पार्क गहाण ठेवण्याचा विचार करत आहे त्या पार्कचं नाव फातिमा जिन्ना पार्क आहे. मदार-ए-मिल्लत फातिमा जिन्ना पाकिस्तानचे संस्थापक असणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची बहीण होती. इस्लामाबादमध्ये त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ बवण्यात आलेलं हे पार्क ७५९ एकरांमध्ये पसरलेलं आहे. हे पार्क येथील स्थानिक लोकं मनोरंजनासाठी वापरतात. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये शहरी भागामध्ये सर्वाधिक हिरवागार प्रदेश म्हणून हे पार्क ओळखलं जातं.

डॉनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सत्ताधारी इम्रान खान सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची ही बैठक करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीमध्येच पाकिस्तानमधील हे लोकप्रिय पार्क आर्थिक संकटावर मात करण्यासाठी थोडा हातभार लागावा या उद्देशाने गहाण ठेवावं की नाही यासंदर्भात चर्चा होणार आहे. सध्या ही बातमी समोर आल्यापासून सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांनी धारेवर धरलं आहे. सोशल नेटवर्किंगवरही हे पार्क गहाण ठेवण्याचा निर्णय घेण्यासंदर्भातील वृत्त समोर आल्यापासून अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हे पार्क देशाच्या संस्थापकांच्या आठवणींशी संबंधित असल्याने ते गहाण ठेऊन पैसा उभारण्यासंदर्भात सरकारने पुन्हा एकदा नीट विचार करावा असं मत अनेकजण व्यक्त करत आहेत. फातिमा जिन्ना पार्क हे जिन्ना कुटुंबाची आठवण म्हणून नाव देण्यात आलेल्या पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या स्थळांपैकी एक आहे.