सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा पेपर फुटल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय पातळीवर या पेपर फुटीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) येत्या सोमवारी किंवा मंगळवारी फेरपरीक्षेच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसईचा दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला. या दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

येत्या एक ते दोन दिवसात पुढे काय करायचे ते सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात येईल. सोमवारी किंवा मंगळवारी सीबीएसईकडून फेरपरिक्षेच्या तारखा जाहीर होऊ शकतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना हि माहिती दिली.  या पेपर फुटी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी २५ जणांची चौकशी केली. खासगी शिकवणी घेणाऱ्या क्लासेसवर मुख्य संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले असून विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

CBSE पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणामुळे माझीही झोप उडाली मीदेखील एक पालक आहे मी या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या पालकांचे दुःख समजू शकतो असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना कठोरातले कठोर शासन केले जाईल. त्यांना लवकरात लवकर शोधण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत असेही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.