राजधानी दिल्लीतील वातावरणात मोठा बदल झाला असून इराण आणि अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या प्रचंड धुळीच्या वादळाचे परिणाम शहरामध्ये जाणवत आहेत. दिल्लीकर सध्या स्वतःला धुळीच्या बंद खोलीत कोंडून घेतल्याचा अनुभव घेत आहेत. खाली जमीन तापलेली तसेच वेगाने वाहणाऱ्या हवेसोबत उडणाऱ्या धुलीकणांमुळे दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर बनला आहे.


केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाने दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार, बुधवारी दिल्लीमध्ये हवेत असलेले धोकादायक धुलीकण १० मानकांपैकी ९ पट जास्त असून ते धोकादायक पातळी ओलांडून ८३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले आहे. पीएम देखील २.५ ही सामान्य पातळी ओलांडून ४ टक्के जास्त नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी हा धुळीचा स्त्रोत इराण, दक्षिण अफगाणिस्तान आणि राजस्थानातून आलेल्या धुळीचे वादळ असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही ठिकाणी ३० हजार फुटांपर्यंत निर्माण झालेल्या धुळीच्या वादळांमुळे दिल्लीसह आसपासचा परिसर व्यापून टाकला आहे.


पुढील २४ तासात सरासरीप्रमाणे दिल्लीत बुधवारी वायू गुणवत्ता निर्देशांक ४४५, गुरुग्राममध्ये ४८८, बुलंदशहर आणि ग्रेटर नोयडात ५००, जोधपूरमध्ये ४२०, मुरादाबादमध्ये ४३१ आणि नोयडात ३४० इतके नोंदवण्यात आले आहे. त्याचबरोबर हरयाणाच्या रोहतक आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये हवा खूपच प्रदुषित झाली आहे. तसेच दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात हवेची गुणवत्ता गंभीर स्थितीत आहे.

दक्षिण-पूर्व भाग सोडून भारताच्या दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पुढील तीन दिवसांसाठी २५ ते ३० किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. १८ जून पर्यंत येथील हवामान कोरडे राहणार आहे.

मात्र, या भागात पाऊस झाल्यानंतरच या धुळीच्या हवेपासून दिल्लीकरांना दिलासा मिळू शकतो असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. १६ आणि १७ जून रोजी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.