भारतात करोना रुग्णांचा संसर्ग दर हा गेल्या बारा दिवसांत दुप्पट झाला असून तो आता १६.६९ टक्के झाला आहे. आठवडय़ातील सकारात्मकता दर हा महिनाभरात वाढून १३.५४ टक्के झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

भारतात २ लाख ६१ हजार ५०० नवीन रुग्ण सापडले असून रविवारी १५०१ मृत्यूंची नोंद झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान या राज्यांत नवीन रुग्णांचे प्रमाण ७८.५६ टक्के आहे. गेल्या बारा दिवसांत रुग्णांचा दैनंदिन संसर्ग दर हा दुप्पट होऊन तो ८ टक्क्य़ांवरून १६.६९ टक्के झाला आहे. आठवडय़ातील राष्ट्रीय संसर्ग दर हा गेल्या महिन्यात ३.०५ टक्के होता तो आता १३.५४ टक्के झाला आहे. छत्तीसगडमध्ये साप्ताहिक संसर्ग दर ३०.३८ टक्के आहे. गोव्यात तो २४.२४ टक्के, महाराष्ट्रात २४.१७ टक्के, राजस्थानात २३.३३ टक्के व मध्य प्रदेशात १८.९९ टक्के होता.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाख १ हजार ३१६ असून हे प्रमाण गेल्या २४ तासांत संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या १२.१८ टक्के आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यांत एकूण ६५.०२ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. एकूण १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार २४३ झाली आहे. दहा राज्यांत एकूण मृत्यूंच्या ८२.९४ टक्के मृत्यू झाले असून ही संख्या १५०१ आहे. महाराष्ट्रात ४१९ बळी गेले असून दिल्लीत बळींची संख्या १६७ आहे.